चंदगड पूर्वभागाला वळीवाने झोडपले, झाडे कोसळल्याने वाहतुकीत व्यत्यय, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा मारा - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2020

चंदगड पूर्वभागाला वळीवाने झोडपले, झाडे कोसळल्याने वाहतुकीत व्यत्यय, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा मारा

माणगावच्या सीम देव मंदिर मार्गावर झाडे कोसळल्याने माणगाव ते माणगाव फाटा या मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला.
कागणी : प्रतिनिधी
            चंदगड तालुक्याच्या पूर्वभागाला रविवार दी. 10 रोजी तिसऱ्यांदा वळीव पावसाने झोडपून काढले. रविवारी दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेदरम्यान कोवाड, शिनोळी, हलकर्णी, डुक्करवाडी, तेऊरवाडी, मरणहोळ परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर माणगाव जवळील सीम देव मंदिर मार्गावर झाडे कोसळल्याने माणगाव ते माणगाव फाटा या मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला.
शिनोळी येथे चेकपोस्टवर लावलेले बॅरीकेट्स असे पाण्यात अर्धे बुडाले होते. 
          यंदाच्या उन्हाळ्यातील हा तिसरा पाऊस असून आजपर्यंतचा मोठा पाऊस ठरला आहे. बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरील शिनोळीजवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभा करण्यात आलेल्या चेकपोस्टजवळही पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तर तेऊरवाडी परिसरातील शिवारातही पाणी साचले आहे.  हलकर्णी परिसरालाही वळीव पावसाने सुमारे तासभर झोडपले. मरणहोळ परिसरात मका, ऊस, बाजरी पिक मोठ्या प्रमाणात आडवे झाल्याने नुकसान झाले. हा पाऊस काजू, ऊस पिकासह मिरची उत्पादनाला फायदेशीर ठरणार आहे. मे अखेरीस कर्यात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूळवाफ पद्धतीने भात पेरणी केली जाते, या पार्श्वभूमीवर पाऊस पडल्याने शेती मशागत करणे सोयीचे होणार आहे. मात्र चंदगड, नागनवाडी परिसराला आजच्या पावसाने हुलकावणी दिली आहे.

No comments:

Post a Comment