तुर्केवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करा, तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2020

तुर्केवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करा, तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

चंदगड तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे होताहेत प्रचंड नुकसान
मजरे कार्वे  / प्रतिनिधी
          गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी फाटा येथील या बाजार समितीचे कार्यालय आणि येथील दुकाने तात्काळ सुरू करावीत आणि चंदगड तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
          सध्या कोराणाने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. चंदगड तालुक्यातही याचा परिणाम दिसून येत आहे. तालुक्यात कोरणाचे रुग्ण आढळून आले नसले तरीही कोरोणाची दहशत मात्र कायम आहे. आजही तालुक्यातील जवळपास पन्नास टक्के व्यवहार बंद अवस्थेत आहेत. तालुक्यातील महत्त्वाच्या सर्व बाजारपेठा मधून आजही शुकशुकाट आहे. तालुक्‍यातील सर्वच आठवडा बाजार बंद आहेत. चंदगड तालुक्याची नाळ बेळगावला जोडी आहे. तालुक्‍यातील सर्वच व्यवहार बेळगावशी निगडित आहेत. बेळगाव जिल्ह्यात वाढलेल्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने शिनोळी येथील सीमा पुर्णपणे बंद केली आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना सीमा ओलांडून जाणे-येणे यावर बंदी आहे. याचा थेट परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत आहे. चंदगड तालुक्यातील शेतकरी बेळगावच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. बेळगावच्या मार्केट यार्ड मध्ये व भाजी मार्केटमध्ये सर्व तालुक्यातील शेती उत्पादने पाठवली जातात. या बाजारपेठेमध्ये सध्या जाता येत नसल्याने शेतकऱ्यांचा माल शेतामध्येच कुजून जात आहे.
          तुर्केवाडी फाटा येथे गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा आहे. ही शाखा बऱ्याच वेळा चालू करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असतानाही याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. या महामारीच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची ही शाखा सुरू असल्यास याचा फायदा येथील शेतकऱ्यांना झाला असता. मात्र येथील सर्वच दुकाने व कार्यालय बंद आहेत. त्यामुळे ही कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशाच पद्धतीची झाली आहे. शेतकऱ्यांना उत्पादित केलेले बटाटे व इतर सर्वच भाजीपाला विकणे मुश्किल झाले आहे. जवळपास कोणतीही बाजारपेठ नसल्याने अडचण वाढली आहे. जोखीम पत्करून बेळगावला जाणेही शक्य नाही. सापडल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे धाडस करताना शेतकरी विचार करत आहे. त्यामुळे तुर्केवाडी फाट्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा सुरू करून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे.

No comments:

Post a Comment