कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर येण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज - माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2020

कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर येण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज - माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
भरमूआण्णा पाटील
मजरे कार्वे /  प्रतिनिधी-
      कोरोना विषाणूचे संकट जगभर पसरले आहे. हे युद्ध आहे, हे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावागावात कोरोना दक्षता समित्या योग्य भूमिका बजावत आहेत. त्या समित्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
        आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख, चंदगडचे तहसीलदार  विनोद रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात या महामारी विरोधातील यंत्रणा सज्ज आहे. प्रशासकीय यंत्रणा कुठेही कमी पडत नाही. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेतील सर्व डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या,  अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, शिक्षिका प्रत्येक घराघरात जाऊन सर्वे करीत आहेत. या सर्व यंत्रणेला नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे. पोलिसांसह प्रत्येक जण आपला जीव धोक्यात घालून या महामारी विरोधात लढत आहेत. यातील प्रत्येक घटकांचे मोल महत्त्वाचे आहे. तालुक्यातील नागरिकांनी ही आपली जबाबदारी समजून गर्दी होण्याच्या ठिकाणी न जाणे, गरज असल्यासच घरातून बाहेर पडणे, बाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करणे, सँनिटायझर व हात धुण्यासाठी नियमित साबणाचा वापर करणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे अशा गोष्टींचे पालन करणे जरुरीचे आहे.
       सध्या चंदगड तालुक्यात पुणे आणि मुंबईहून येणाऱ्या तालुकावाशीयांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना कोणीही परके समजू नये. त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र पुण्या-मुंबईहून येणाऱ्यांनी सुद्धा तालुक्यातील स्थानिक दक्षता समित्याना सहकार्य करून विलगीकरण मान्य करावे. यात सर्वांचेच भले आहे. हा लढा रोग्या विरुद्ध नाहीतर रोगा विरुद्ध आहे. हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने वागून प्रशासनास सहकार्य करावे व तया महामारी तून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहनही या पत्रकात माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment