स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेताना दोघांना पकडले, चंदगड पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2020

स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेताना दोघांना पकडले, चंदगड पोलिसांची कारवाई

चंदगड / प्रतिनिधी
न्हावेली (ता. चंदगड) येथील बचत गटामार्फत चालविल्या जाणाऱ्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी अल्प दरात दिलेला तांदुळ चोरट्या मार्गाने चंदगडला नेत असताना ग्रामस्थांच्या माहीतीवरुन चंदगड पोलिसांनी जांबरे रोडवरील देसाईवाडी येथे पकडला. या प्रकरणी मोहन डोणकर, कमलाकर सावंत (दोघे रा. चंदगड) व सुनिता गावडे (रा. न्हावेली) यांच्यावर जीवनावश्यक वस्तु प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काल रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान हि घटना घडली. महेश बाबळे यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली. 
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहीती अशी – न्हावेली येथे वाघदादेवी महिला बचत गटामार्फत सरकारमार्फत स्वस्त धान्य दुकान कर्मचारी सुनिता गावडे या चालवितात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात तांदुळ व गहु वाटप करण्यासाठी सरकारने या धान्य दुकानदारांच्याकडे माल पुरविला आहे. न्हावेली येथील या दुकानदाराने रेशन कार्ड धारकांना त्यांच्या हक्कांचा आलेला तांदुळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी काल रात्री (ता. 5) चंदगड येथील मोहन डोणकर व कमलाकर सावंत (दोघेही रा. चंदगड) यांच्या मारुती ओम्नी (गाडी नं. एम. एच. 09, ए बी 8663) या पांढऱ्या रंगाच्या गाडीत तांदुळाच्या आठ प्लॅस्टीकच्या गोण्या (पोती) चंदगडच्या दिशेने घेवून जात असताना ग्रामस्थांनी चंदगड पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. त्यानुसार जांबरे रोडवर असणाऱ्या देसाईवाडी लगतच्या पावसकर यांच्या पोल्ट्री फॉर्मसमोर रोडवर ग्रामस्थ व पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्याकडील माल हस्तगत केला. त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तु प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. हे. कॉ. श्री. सुतार तपास करत आहेत. 


No comments:

Post a Comment