कुदनूर नजीक ओढा पात्रात धक्का बांधण्यासाठी ठेकेदाराने मारलेली चर. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
कुदनूर (ता. चंदगड) नजिक ओढा पात्रात फेब्रुवारीपासून सुरू असलेले धक्क्याचे बांधकाम करोना संकटामुळे रखडले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास किटवाड कडून येणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कालकुंद्री - कुदनुर रस्ता वाहुन जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यापासून ओढ्याचे पात्र पंधरा ते विस फूट अंतरावर होते. दरवर्षी पाण्यामुळे जमिनीची धूप झाल्यामुळे गेल्या दोन वर्षात ओढ्याचे पात्र रस्त्याला येऊन ठेपले आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम कडून येथे ठेकेदारांमार्फत फेब्रुवारीत सुरू करण्यात आलेले काम करोनामुळे बंद आहे. मात्र धक्का बांधण्यासाठी रस्त्यालगत पात्रात ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने र खुदाई केली आहे. ते काम अपुर्ण अवस्थेत आहे. किटवाडच्या दोन्ही धरणांतून सोडलेले पाणी या चरीतूनच पुढे वाहत आहे. हीच स्थिती पावसाळ्यापर्यंत राहिली तर पावसाळ्यात येणाऱ्या ओढ्यातील पुराच्या पहिल्याच दणक्यात रस्ता वाहून जाणार आहे.
हा रस्ता कोवाड-बेळगाव मार्गावरील कागणी पासून कालकुंद्री, कुदनुर, राजगोळी, दड्डी ते राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी पर्यंत जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. हे ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास पावसाळ्यापूर्वी धक्का बांधकाम पूर्ण करण्यास सांगावे. रस्त्याची सुरक्षा यापुढे बांधकाम विभाग व ठेकेदाराची राहील. रस्त्याला धोका उत्पन्न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
याशिवाय ओढ्यावरील मोरी पासून कालकुंद्री कडील पाचशे मीटर रस्त्याचा भराव मागील पावसाळ्यात वाहून गेला आहे. ठिकठिकाणी रस्त्याला भगदाडे पडली आहेत. येथे पुन्हा भराव टाकून रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment