कालकुंद्री येथील शेतवडीत दारूच्या बाटल्यांचा खच, शेतकऱ्यांसमोर नवे संकट - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2020

कालकुंद्री येथील शेतवडीत दारूच्या बाटल्यांचा खच, शेतकऱ्यांसमोर नवे संकट

कालकुंद्री कागणी रस्त्यावर शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतानजिक टाकण्यात आलेल्या दारू बिअरच्या बाटल्या.
कालकुंद्री (प्रतिनिधी)
          कालकुंद्री (ता. चंदगड) येथील मुख्य रस्त्यांच्या शेजारील शेतवडीत काचेच्या, प्लॅस्टिकच्या रिकामी दारूच्या बाटल्यांचा खच पडत आहे. रस्त्यावरील मोर्‍यांच्या कठड्यावर बसून काही तळीराम रात्री दारू, बियरच्या बाटल्या पिऊन तेथेच फोडून जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर हे नवे संकट उद्भवले आहे. किंबहुना असे प्रकार सर्वच रस्त्यांवर दिसत आहेत.
         कालकुंद्री येथील शेतकरी राजेंद्र गुंडू पाटील यांचे  कालकुंद्री कागणी रस्त्यावर शेत आहे. रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या गटारीत वारंवार  दारुड्यांकडून विविध ब्रांडच्या शेकडो बाटल्या फेकल्या जात आहेत. इतक्या बाटल्या एकटा दारुडा पिऊ शकणार नाही. त्यामुळे हे कोणा विक्रेत्यांचे काम असावे काय? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सुरुवातीस कुणीतरी टाकले असतील म्हणून राजेंद्र पाटील बाटल्यांची स्वत: विल्हेवाट लावत. पण आता हे नेहमीचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. हीच गत कालकुंद्री कुदनुर, कालकुंद्री किटवाड रस्त्यांवरही दिसत आहे. काही ठिकाणी बाटल्यां सोबत पार्ट्यांच्या  पाऊलखुणा दाखवणारे प्लॅस्टिकचे ग्लास, पत्रावळ्या, पाणी व सोडावॉटर बाटल्या, पिशव्या फेकलेल्या दिसून येतात.
         पिकाऊ जमीनत काचा व प्लास्टिक वस्तू विखुरल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. आत्ता खरीप हंगाम व पावसाळा सुरू होणार असल्याने शेतीसह पाण्याच्या पाटांमध्ये फोडून टाकलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे शेती मशागत करताना किंवा पाटाने पाणी देताना जीवघेणे ठरणार आहेत. बाटल्या टाकणारे समाजकंटक हे शेतकरी कुटुंबातीलच असल्यामुळे याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्त्यावर व शेतजमिनीत बाटल्या फेकून पर्यावरणाची हानी करणाऱ्या समाजकंटकांना लगाम लावण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शासकीय व पोलीस यंत्रणेमार्फत उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment