चंदगड तालुक्यात सापडले आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या पोहोचली १७ वर, चिंतेत भर - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2020

चंदगड तालुक्यात सापडले आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या पोहोचली १७ वर, चिंतेत भर

चंदगड / प्रतिनिधी
देशासह राज्यात कोोरोनाचे संकट दिवसेनदिवस वाढत असतानाच चंदगड तालुक्यातही रुग्णसंख्या वाढती आहे. आज दिवसभरात चंदगड तालुक्यात शिवनगे व इब्राहिमपूर येथे प्रत्येकी एक व चिंचणे येथे दोन असे नवीन चार रुग्ण सापडल्याने चंदगड तालुक्याची रुग्णसंख्या आता १७ वर पोहोचली आहे. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी तालुकावाशियांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे-मुंबईसह अन्य शहरातून आलेल्या नागरीकांच्यामुळे चंदगड तालुक्यामध्ये रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. 
चंदगड तालुक्यात गेल्या महिनाभरात एकही रुग्ण नव्हता. ९ मे २०२० रोजी पहिला रुग्ण अलबादेवी येथे सापडला. त्यानंतर गवसे येथे तीन, सोनारवाडीमध्ये एक, चिंचणे (कमलवाडी) एक अशी सहा संख्या झाली. गुरुवारी एकाच दिवसात नागणवाडीमध्ये एक, इब्राहिमपूरमध्ये एक, तेउरवाडीमध्ये दोन, बोजुर्डेमध्ये एक तर नागवेमध्ये दोन असे सात रुग्ण सापडले. आज शुक्रवारी (ता. 22) चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुकावाशियांच्या चिंचेत भर पडली आहे. चिंचणे येथे सापडलेले रुग्ण हे तीन दिवसापूर्वी सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. हे तिघेही शाळेमध्ये क्वारंटाईन होते. चंदगड तालुक्यात वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चंदगड शहर व कोवाड येथील बाजारपेठा आज दिवसभर कडकडीत बंद होत्या. चंदगड येथे केवळ बँकीग सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. वाढत चाललेल्या रुग्णसंख्या पाहता सर्वांनी जाणीवपूर्वक काळजी घेण्याची गरज आहे. 

आज चंदगड तालुक्यात चार नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेले चारही पॉझिटीव्ह रुग्ण हे त्या-त्या गावातील शाळेत क्वारंटाईन होते. त्यांना तातडीने चंदगड येथे करोना केअर सेंटरमध्ये आणण्याचे काम सुरु आहे. चिंचणे येथे सापडलेले दोन रुग्ण हे याआधी सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आले असल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली. 

No comments:

Post a Comment