चंदगड (प्रतिनिधी)
कागणी (ता. चंदगड) येथे मारुती अमृत भोगन (वय-३६) याला त्याची सावत्र आई लक्ष्मीबाई अमृत भोगण (वय-६५) हिने जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तो ७० टक्के भाजला होता. त्याचे आज २६ रोजी दुपारी कोल्हापूर सीपीआर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यामुळे सावत्र आईवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.
घरगुती कारणावरुन लक्ष्मीबाई हिने २२ मे रोजी रात्री झोपेत असताना मारुती, त्याची पत्नी व मुले यांना झोपलेल्या अवस्थेत रॉकेल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात मारुती यांची पत्नी व मुले बचावली. तथापि मुलगा मारुती भाजून गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर शुक्रवारी गडहिंग्लज विभागीय पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर यांनी कागणी येथे प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते हे तपास करत होते. २३ रोजी लक्ष्मीबाईला पोलिसांनी ताब्यात घेऊन चंदगड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तथापि वैयक्तिक जातमुचलक्यावर तिला सोडून दिले होते. आत्ता जखमी मारुती याचा मृत्यू झाल्यामुळे सावत्र आईवर कोणती कारवाई केली जाते.याकडे चंदगड तालुका व उपविभागाचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment