चंदगड तालुका मेडिकल असोशिएशनने वैद्यकीय मदत करावी - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2020

चंदगड तालुका मेडिकल असोशिएशनने वैद्यकीय मदत करावी - आमदार राजेश पाटील

आमदार राजेश पाटील यांच्याकडून चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ पाटील यांचेकडे पी. पी. ई. किटचे वितरण करताना.

तेऊरवाडी / प्रतिनिधी
     चंदगड तालुक्यात वैद्यकिय सुविधा अपुऱ्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाशी लढा देण्यासाठी शासकीय यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. अशा परिस्थितीत चंदगड तालुका  मेडीकल सोसिएशनने  सरकारला वैद्यकिय सेवा देऊन सहकार्य करावे. असे अवाहन चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.  कोवाड (ता. चंदगड) येथे आमदार पाटील यांच्याकडून चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनला विविध वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
      आमदार श्री. पाटील पुढे म्हणाले, ``चंदगड मतदारसंघात वैद्यकिय साधनांची कमतरता आहे. यासाठी ५० लाखांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये २० लाखांच्या दोन अँम्बुलन्स व ३० लाखांचे इतर वैद्यकिय साहित्य तात्काळ खरेदीला परवानगी दिली आहे. त्याबरोबरच चंदगड तालुका संघाकडूनही दिलेला ११ लाख ११ हजारांचा निधीही मतदार संघातील वैद्यकिय सेवेसाठी वापरण्यात येत आहे. सिमा भागातील शेतकरी, शिनोळी, हलकर्णी येथील कंपन्या व कामगार  यांना होणारा त्रास लक्षात घेऊन कर्नाटक व महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून सीमा बंदी उठवण्यासंदर्भात विनंती करणार आहे. तसेच चंदगडला स्वॅब देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कर्नाटकच्या धर्तीवर सर्वांचे स्वॅब हे प्रत्येक विलगीकरण कक्षात जाऊन घेण्याची विनंती प्रशासनास  करणार आहे.``
       जनता लॉकडाऊनपूर्वी मतदारसंघात जवळपास १० हजार चाकरमानी गावी परत आले असल्याचे सांगून ते म्हणाले, `` आतापर्यंत २५ ते ३० हजार चकरमानी गावी परतले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांसाठी आरोग्य सेवेबरोबर ग्रामदक्षता कमिट्या नजर ठेवून आहेत. आता वैद्यकिय सेवा देणाऱ्या सर्व खाजगी डॉक्टरांना पीपई किट,  सॅनिटायझर, फेसमास्क आदि साहित्याचा पुरवठा केला आहे. त्यामुळे या सर्वानी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात वैद्यकिय सेवा पुरवावी. करोनाला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेऊन धैर्याने सर्वानी कोरोनाशी लढण्याचे आवाहनही त्यानी केले. तसेच खाजगी आयुष डॉक्टरांच्या मागणीनुसार सरकारकडून वैद्यकिय सेवेचा  आदेश देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील  यानी सांगितले.``
          सुर्यकांत पाटील यांनी स्वागत केले. डॉ. सुहास धबाले यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकिय अडचणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ पाटील यांनी मांडल्या. यावेळी कोवाडचे उपसरपंच विष्णू आढाव, तानाजी गडकरी, डॉ. संजय तळगुळकर, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. व्ही. पी. पाटील, डॉ. शशिकांत किणीकर, जानबा पाटील, डॉ़. प्रसाद बामणे आदि मान्यवर उपस्थित होते.

नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था माणगावच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग -१५० पिपई किट, मलिग्रे (ता. आजरा) येथील श्री पारधी सध्या रा. ठाणे ( अरविंद सर्जिकल आणि डिस्ट्रिब्यूटर)यांचेकडून - सॅनिटाझर व मास्क तर राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते यांच्याकडून इतर वैद्यकिय साहित्य मदत म्हणून देण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment