तालुक्यात कोरोना प्रवेशाच्या पार्श्वभूमिवर तुर्केवाडी गाव सतर्क, बाहेर गावाहून येणाऱ्यांसाठी दक्षता समितीसह अन्य समित्या सज्ज - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2020

तालुक्यात कोरोना प्रवेशाच्या पार्श्वभूमिवर तुर्केवाडी गाव सतर्क, बाहेर गावाहून येणाऱ्यांसाठी दक्षता समितीसह अन्य समित्या सज्ज

तुर्केवाडी (प्रतिनिधी) :
         कोरोनाचा चंदगड तालुक्यात शिरकाव झाल्याने सर्वंच गावांनी सतर्कता बाळगण्यास सुरवात केली आहे. कोणत्याही प्रकारचा कोरोनाचा संसर्ग आपल्या गावामध्य होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गावातील कोरोना दक्षता समित्या, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी हे सज्ज झाले आहेत.
         शासनाच्या निर्णयानुसार बाहेर गावी अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या गावी येण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार तुर्केवाडी गावामध्येही साधारण ३३१ लोक बाहेर गावी आहेत. तुर्केवाडी गावातील तीनशे तर वैताकवाडी व यशवंतनगरमधील ३१ लोकांचा यामध्ये समावेश आहे. त्यातील काही लोक गावी येण्याच्या मार्गावर असून त्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती तलाठी गणेश ठोसरे यांनी दिली.
        तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावामध्ये खबरदारी घेतली जात आहे. सर्वांना सोशल डिन्स्टसिंग राखणे, मास्क घालणे, स्वच्छता राखणे अशा सुचना दिल्या आहेत. गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांना योग्य त्या सुचना दिल्या जात असून येतांना संबंधित प्रशासनाची परवानगिच घेवून गावी येण्याची विनंती करण्यात येत असल्याचे सरपंच रुद्राप्पा तेली यांनी सांगितले.
         दरम्यान, बाजारपेठेचं गाव असलेल्या तुर्केवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. बाहेरुन येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, विलगीकरण, राहण्याची सोय, स्वच्छता, भोजन अशा विविध सुविधांचा आढावा घेतला जात आहे. यासंदर्भात कोरोना दक्षता समितीने बैठक घेवून शासनाच्या नियमानुसार विविध समित्या नेमल्या आहेत. त्यांना बाहेरील आलेल्या प्रत्येकाला वैद्यकीय तपासणीला पाठवणे, त्याच्या आरोग्याची माहिती घेणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांचे विलगिकरण करणे, त्यांच्या निवासाची, भोजनाची सोय करणे, विलगिकरणाच्या ठिकाणची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे तसेच विलगिकरण कक्षातील नागरिकांचे मानसिक स्वास्थ राखण्याच्या दृष्टीने मनोरंजनाची सोय करणे अशा विविध दबाबदाऱ्या देण्यात आल्याचे गावकामगार पोलिस पाटील माधुरी कांबळे यांनी सांगितले.
           या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठीत व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून सुरक्षा समिती अध्यक्षपदी महादेव मिनाजी निवगीरे, समन्वय समिती अध्यक्षपदी जे.एल तोराळकर, वैद्यकीय समिती अध्यक्षपदी जोतिबा ओमाना गावडे, निवासी समिती अध्यक्षपदी भरमाना हेमकाना अडकुरकर, भोजन समिती अध्यक्षपदी चेतन चिंतरंजन बांदिवडेकर, स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी अशोक गणपती ओऊळकर, मनोरंजन समितीच्या अध्यक्षपदी एम.के पाटील तसेच आणिबाणी समितीच्या अध्यक्षपदी सरपंच रुद्राप्पा वैजू तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment