कार्वेसह पंचक्रोशीत १६ मेपासून लॉक डाऊन करणार कडक, अकरा गावच्या सरपंच, पोलीस पाटील यांचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2020

कार्वेसह पंचक्रोशीत १६ मेपासून लॉक डाऊन करणार कडक, अकरा गावच्या सरपंच, पोलीस पाटील यांचा निर्णय

सर्वच फाट्यावरील व्यवहार  राहणार बंद.

मजरे कार्वे / प्रतिनिधी
       चंदगड तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटणे फाटा व हलकर्णी फाटा यासह तांबुळवाडी फाटा ते तडशीनहाळ - सुपे फाट्यापर्यंत १६ मे पासून लाँकडाऊन एकदम कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मजरे कार्वे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हलकर्णी, तुर्केवाडी, जंगमहट्टी, धुमडेवाडी, तांबुळवाडी, बसर्गे, तावरेवाडी, मुरकुटेवाडी मौजे कार्वे तडशीनहाळ या गावच्या सरपंच व पोलीस पाटील यांची सामाजिक अंतर जपून व्यापक बैठक मजरे कार्वे येथे पार पडली. या बैठकीत पुढील काळात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करून कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मजरे कार्वे चे सरपंच शिवाजी तुपारे होते.
         येत्या १५ तारखेपर्यंत या परिसरात दिलेल्या वेळेत सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील व १६ तारखेनंतर ३१ मे पर्यंत सर्व फाट्यावरील सर्व व्यवहार व गावपातळीवरील बांधकाम साहित्य विक्रेत्यांची दुकाने पूर्णतः बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी सेवा केंद्र व औषधांची दुकाने यांना सूट देण्यात आली आहे. सध्या कोरोणाचा पादुर्भाव जगभर वाढत आहे. चीनमधील ही साथ चंदगड तालुक्यात कधी दाखल झाली ते कळलेही नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात यायला उशीर लागणार नाही.यासाठी हे लाँँकडांऊनचे नियम कडक करण्यात येणार आहेत. या परिसरातील सर्व फाट्याना बाजाराचे स्वरूप आले आहे. हलकर्णी व पाटणे फाटा येथे तर जवळपासच्या २५ हून अधिक गावांचा संपर्क येतो. तसेच बेळगाव - वेंगुर्ला हा प्रमुख रस्ता असल्याने कुठूनही प्रवासी या ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे यावेळी या कमिटी मार्फत जाहीर करण्यात आले. यासाठी बंद कालावधीत प्रत्येक व्यावसायिकाने, ग्राहकांनी सहकार्य करावे. असे आवाहन करून  हे एक युद्ध आहे आणि हे युद्ध प्रत्येकाने आपल्या घरात बसून जिंकायचे आहे. त्यामुळे घरी राहा व सुखी राहा असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. या बैठकीस चंदगडचे बीट हवालदार डी एन पाटील तलाठी राजश्री पचंडी, तांबुळवाडी चे सरपंच संजय पाटील, तूर्केवाडीचे सरपंच रुद्राप्पा तेली, हलकर्णीचे सरपंच एकनाथ कांबळे, डॉ. एन टी मुरकुटे यांचेसह 11 गावचे सरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते. आभार ग्रामसेवक शिवाजी दुंडगेकर यांनी मानले.

                                        या परिसरात पोलिस बंदोबस्त द्यावा.
         विनाकारण वाहने फिरवून फाट्या फाट्यांवर फिरवून  प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या नागरिकांच्या वर कारवाई व्हावी. यासाठी या पंचक्रोशीत गस्त घालण्यासाठी व पाटणे फाटा व हलकर्णी फाटा या वर्दळीच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण यावे यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी अशी मागणी चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्याकडे या वेळी सर्वांच्या मार्फत करण्यात आली.
        

No comments:

Post a Comment