न्हावेली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी, तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2020

न्हावेली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी, तहसिलदारांना निवेदन

न्हावेली (ता. चंदगड) येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करावा, या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांना देताना न्हावेलीतील काही ग्रामस्थ.
चंदगड / प्रतिनिधी
न्हावेली (ता. चंदगड) येथील स्वस्थ धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेताना चंदगड पोलिसांनी दोघांना पकडुन दुकानचालकासह तिघांच्यावर गुन्हा नोंद केला होता. गरीब जनतेला मिळलेला रेशनाचा तांदुळ काळ्या बाजारात विकणाऱ्या या धान्य दुकानदाराचे दप्तर ताब्यात घेवून त्याचा परवाना रद्द करवा अशी मागणी ग्रामस्थांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ५ मे रोजी बेकायदेशिर धान्य विकण्यासाठी नेताना ग्रामस्थ व पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. दोन दिवस उलटूनही अद्याप तालुका पुरवठा विभागाने  सदर धान्य दूकानचे दप्तर ताब्यात घेतले नाही. पुरवठा विभागाच्या वतीने दप्तर तपासणीवेळी तक्रारदार अथवा ग्रामस्थांना सोबत घेतले नाही. पोलिसांचा तपास होण्याअगोदरच पुन्हा लोकांची रेशन कार्ड घेण्यात येत आहेत. त्यामुळे यामध्ये दप्तर योग्य दाखवण्यासाठी उघड खोटारडेपणा दिसून येत आहे. या सर्व प्रकरणात पुरवठा विभाग दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. धान्याची गाडी पकडूनही दोन दिवसाने गुन्हा नोंद होतो. याचा अर्थ गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा  आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रेशन कार्डमध्ये अनेक नावे असूनही कमी रेशन वाटप केले जाते. लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेत अनेक कारणे सांगून धान्य दिले जात नाही. महिन्यातून एकदाच धान्य वितरीत केले जाते. तसेच दुकानात दरफलकही लावला गेलेला नाही. अशा प्रकारे सामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या दुकानांची रितसर चौकशी करून दोषींना कडक कारवाई करावी व दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर अशोक पेडणेकर, संतोष पाटील, शिवाजी कांबळे, लक्ष्मण पाटील, श्रावण पाटील, विजय पाटील, मंगेश गावडे,दीपक गावडे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 


No comments:

Post a Comment