कर्यात भागात भाताची कोरवाफ पेरणी अंतिम टप्प्यात - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2020

कर्यात भागात भाताची कोरवाफ पेरणी अंतिम टप्प्यात


कार्यात भागातील कालकुंद्री येथे बैलांच्या साह्याने भाताची कोरवाफ पेरणी करताना शेतकरी कुटुंब.
कालकुंद्री (प्रतिनिधी) 
             आठवडाभर संततधार बरसणाऱ्या मृगनक्षत्राने सध्या उघडीप दिली आहे. ही संधी साधून कर्यात भागातील शेतकरी धूळवाफ पेरणी नंतर कोरवाफ पेरणीत गुंतला आहे.
            भात पिकाचे कोठार समजल्या जाणाऱ्या चंदगडच्या पूर्व भागातील तीस-चाळीस गावांत काळी चिकट माती  असल्यामुळे चिखल तयार करून त्यात भात रोप लावणी करणे फारच जिकिरीचे असते. हे टाळण्यासाठी इथला शेतकरी पावसापूर्वी धुळवाफ व पाऊस पडल्यानंतर ओल्या मातीत कोरवाफ पेरणीला प्राधान्य देतो. पेरणीसाठी या भागात विशेषता पाच पात्त्यांच्या कुरीचा वापर होतो. कुरी ओढण्यासाठी सध्या चार माणसांची ताकद अपुरी पडत असल्याने याकामी बैल जोडी चा वापर सुरू आहे. त्यामुळे पेरणीसाठी बैलजोड्या मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसातील पावसाच्या उघडीपीमुळे पेरणी शक्य झाल्याने कर्यात भागातील भात पेरणी खरीप हंगाम खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात आला आहे. तथापि पाणथळ जमिनीत चिखलातील भात लावणी शिवाय गत्यंतर नसल्यामुळे शेतकरी भात रोपासाठी तरवे टाकण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे धूळपेरणी नंतर चांगली उगवण झालेल्या शिवारात कोळपणी व माळ जमिनीत भुईमूग पेरणीची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment