ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे पारगड किल्ला ते मोर्ले रस्त्याला भगदाड, पुल न बांधता रस्त्त्यावर मातीचा टाकला होता भराव - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2020

ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे पारगड किल्ला ते मोर्ले रस्त्याला भगदाड, पुल न बांधता रस्त्त्यावर मातीचा टाकला होता भराव


पहिल्याच पावसात वाहून गेलेला पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता. (छाया : तुळशीदास नाईक, दोडामार्ग)
दोडामार्ग / सी. एल. वृत्तसेवा
        कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत चंदगड  तालुक्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सीमेवर असलेल्या पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता कामाला कोट्यावधी रुपये मंजूर होऊन काम सुरू झाले.चंदगड हद्दीतील काम हे शेकडो किलोमीटर दूर अंतरावरून असलेल्या सोलापूर येथील एका  ठेकेदाराला दिले गेले. पण या ठेकेदाराचे कामगार किंवा इतर कुणीही येथे नाही. शिवाय चंदगड बांधकाम विभाग यांनी डोळेझाक केली. या रस्त्त्यावर नदी आहे येथे पुल बांधकाम करणे आवश्यक होते  ते न करता नदी पात्रात पाईप घालून मातीचा भराव टाकून तयार केलेला रस्ता नदीला आलेल्या पहिल्याच पाण्यामुळे या रस्ताला भगदाड पडून मोर्ले ते पारगड किल्ला मिरवेल या गावांचा संपर्क तुटला आहे.
       मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा या दोन्ही बांधकाम विभाग यांच्याकडून केला जात आहे.पावसाळ्यापूर्वी दोडामार्ग हद्दीतील काम बंद होते पण चंदगड तालुका हद्दीतील पारगड किल्ला ते मिरवेल मोर्ले गाव सीमा हद्द असे काम ठेकेदार यांनी सुरू ठेवले होते. 
   मोर्ले ते पारगड दरम्यान रस्त्त्यावर  नदी आहे पावसाळ्यात मोठे पाणी असते तर उन्हाळ्यातही नदीचा प्रवाह सुरूच असतो. येथे पुल बांधकाम करण्यासाठी पिलर उभे करण्यासाठी खोदकाम केले पण पुलाचे बांधकाम न करता बेजबाबदार ठेकेदाराने एकच पाईप घालून त्यावर मातीचा भराव दगड टाकून रस्ता तयार केला होता. 
     सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणा मुळे नदी पात्रात पुल न बांधता एकच पाईप टाकल्यामुळे मंगळवारी झालेल्या पावसामुळे डोंगर दऱ्याखोऱ्यातून आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ता वाहून  धोका निर्माण झाला आहे.
    पावसाळ्यात मोर्ले ते पारगड, मिरवेल, इसापूर, नामखोल या गावातील ग्रामस्थ यांची येजा असायची पण आता रस्ता वाहुन गेला आहे त्यामुळे वरिल गावातील ग्रामस्थ यांचा संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूने कोणी नदीत पडू नये यासाठी येथे सुरक्षेसाठी रस्त्त्यावर लाकडी कुंपण किंवा अडथळा निर्माण करण्यासाठी  ठेकेदार यांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे. चंदगड बांधकाम विभाग येथील उप‌अभियंता मुल्ला यांना याबाबत विचारले असता येथे ठेकेदाराची कूणी मंडळी नाही तो सोलापूर येथे राहातो असे सांगितले.  याला ठेकेदारामार्फत झालेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम व संबंधित विभागाची डोळेझाक जबाबदार आहे असा आरोप होत आहे.

No comments:

Post a Comment