कडलगेत मुख्य रस्त्यावर दलदल, वाहतूक धोकादायक, अपघाताची शक्यता - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2020

कडलगेत मुख्य रस्त्यावर दलदल, वाहतूक धोकादायक, अपघाताची शक्यता

कडलगे बु. : मुख्य रस्त्यावर झालेली दलदल.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
        कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे गावातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायत ते प्राथमिक शाळेपर्यंत दलदल निर्माण झाली असून तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. गावातील अन्य रस्ते भक्कम असताना दिवसभर वर्दळ असलेल्या या मुख्य रस्त्याकडे नेहमी दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू झाला असताना दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोसाठी या रस्त्यावर माती आणून टाकली आहे. त्यामुळे चिखलराडीतून चालत जाणेही कसरतीचे बनले असून आधीचा कच्चा रस्ता बरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक वाहनचालक घसरून पडत असून निसरटीमुळे चालत जाणे धोक्याचे बनले आहे.  या मार्गावर दोन दूध संस्था, अंगणवाडी, प्राथमिक शाळा आहेत. शेताकडे आणि परगावात जाण्यासाठी सर्व ग्रामस्थ याच रस्त्यावरून ये जा करतात. 
         गावातील अन्य रस्ते सिमेंटीकरण झाले असताना या रस्त्यासाठी मात्र निधी मंजूर करून घेण्यासाठी ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. सबंध पावसाळा तोंडावर असताना या रस्त्यावरून शाळकरी मुले कशी ये जा करणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे नागरिकांची सहनशीलता न पाहता  ग्रामपंचायतीने हा रस्ता तातडीने वाहतूक योग्य बनवावा, अशी मागणी  होत आहे.

No comments:

Post a Comment