चार दिवसात ताप, सर्दी, खोकला कमी न झाल्यास स्वॅब घेणार - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोत - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2020

चार दिवसात ताप, सर्दी, खोकला कमी न झाल्यास स्वॅब घेणार - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोत

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
       राज्यासह जिल्ह्यात व तालुक्यातही दिवसेनदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या महिनभरापासून पुणे-मुंबईसह अन्य शहरातून अनेक लोक आपल्या गावी आले आहेत. बाहेरुन आलेल्यांच्यामुळे आज चंदगड तालुक्याची रुग्णसंख्या ६७ वर पोहोचली आहे. असे असताना कोणत्याही व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास व उपचार घेवून चार दिवस कमी न आल्यास अशा व्यक्तीचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली. 
        प्रशासकीय पातळीवर शहरातील नागरीकांना काही अटीवर गावी यायला परवानगी मिळाल्यानंतर अनेक लोक गावी आले आहेत. विशेषत: पुणे व मुंबई शहरात तालुक्यातील अनेक लोक कामानिमित्त वास्तव्याला होते. शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे लोक रितसर परवानगी घेवून चंदगड तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत. अशा व्यक्तींना १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण व १४ दिवस होम क्वारंटाईनच्या आदेशानुसार कार्यवाही केली आहे. तरीही या व्यक्तीच्या संपर्कात काही स्थानिक लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास व उपचार घेवून चार दिवस कमी न आल्यास अशा व्यक्तीचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. चंदगड तालुक्यात आतापर्यंत १८०७ व्यक्तींचे स्वॅब घेतले असून त्यातील ६७ रुग्ण पॉझिटीव्ह निघाले होते. त्यातील ३५ रुग्ण आतापर्यंत बरे होवून घरी गेले आहेत. चंदगड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये १६ रुग्णांच्यावर उपचार सुरु आहेत. बाहेरुन येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरणासाठी ॲग्नेल स्कुल, स्टिफन स्कुल व माडखोलकर महाविद्यालय या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 


No comments:

Post a Comment