पंचावन्न वर्षांपासून सापांबद्दल समाज जागृतीसाठी तैनात ढोलगरवाडीची सर्प शाळा - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2020

पंचावन्न वर्षांपासून सापांबद्दल समाज जागृतीसाठी तैनात ढोलगरवाडीची सर्प शाळा

कालकुंद्री सी एल वृत्तसेवा
 आद्य सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी 1966 शेतकरी शिक्षण मंडळ व मामासाहेब लाड माध्यमिक विद्यालयाची स्थापना ढोलगरवाडी येथे केली. या माध्यमातून गेली पंचावन्न वर्षे या संस्था व शाळेशी संलग्न असलेली सर्प शाळा सापांविषयी समाजातील गैरसमज व अंधश्रद्धा  यापासून समाज प्रबोधनात तैनात आहे.
   समाजातील सापांविषयी अंधश्रद्धा, अंधरुढी परंपरा, दंतकथा, गैरसमज यातून समाज  प्रबोधनाचा वसा बाबुराव टक्केकर यांनी घेतला. गावात आढळलेले साप पकडून शाळेत ठेवण्यास सुरुवात केली तथापि सत्यशोधक विचारांच्या बाबुराव तक्केकर यांना ग्रामस्थांनी वाळीत टाकले, पण त्यांनी हाती घेतलेला वसा सोडला नाही. त्यांच्या प्रबोधनातून हळूहळू समाज जागृती झाली. आणि ढोलगरवाडी चे नाव जागतिक पातळीवर पोहोचले. या सर्प शाळेला 1977 साली महाराष्ट्र वन विभाग व झू अथोरिटी ऑफ इंडिया या संस्थांची मान्यता मिळाली. तथापि गतवर्षी 'झू ' च्या अटी ढोलगरवाडी सर्पालय पूर्ण करत नाही यास्तव मान्यता रद्द करण्यात आली.  परंतु ढोलगरवाडी सर्पालय हे परिसरातील लोकांसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील सर्प प्रेमी, वैद्यकीय महाविद्यालये, वनविभाग, पोलीस, सैन्यदल, डॉक्टर यांच्यासाठी माहितीचे स्त्रोत बनले आहे. हे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाल व झू अथोरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांना संस्थेचे उपाध्यक्ष व सर्पालय विभागाचे कार्यकारी संचालक तानाजी वाघमारे यांनी पटवून दिलेव मान्यते संदर्भात मुदतवाढ मिळविण्यात यशस्वी ठरले. यासाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, आमदार, खासदार,  गोवा व कर्नाटक सीमा भागातील आमदार, खासदार यांच्या शिफारशी घेऊन हे सर्पालय समाजासाठी किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. 
देश-विदेशातील सर्व वन्यजीव प्राणिसंग्रहालयांना शासकीय मदत मिळते. तथापि ढोलगरवाडी चे सर्पोद्यान गेली पंचावन्न वर्षे बाबुराव टक्केकर व संस्थेने पदरमोड करून चालवले व टिकवले आहे. यापुढील काळात तरी महाराष्ट्र शासनाने पर्यावरण साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या सापांचे हे प्रबोधन केंद्र व संग्रहालय टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी शासकीय पातळीवरून अनुदान द्यावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. 
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपंचमी निमित्त होणारे येथील सर्प प्रदर्शन प्रबोधन रद्द करण्यात आले.  आज शेतकरी शिक्षण मंडळ अध्यक्ष नितीन चौगुले, सर्पालय अध्यक्ष संदीप टक्केकर, विभाग प्रमुख प्रा. सदाशिव पाटील, प्रकाश टकेकर, मुख्याध्यापक एस आर पाटील आदी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत सर्प पूजन व सर्पमित्र कै. टक्केकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

 *सी एल न्यूज वर उद्यापासून सापांविषयी माहिती देणारी मालिका 
 *सी (चंदगड लाईव्ह) न्यूज च्या तमाम वाचक व दर्शक बंधू- एलभगिनींसाठी शेतकरी शिक्षण मंडळ, मामासाहेब विद्यालय व सत्यशोधक सटुप्पा वाघमारे जुनिअर कॉलेज ढोलगरवाडी यांच्या सौजन्याने आपल्या परिसरासह देशात आढळणारे विषारी बिनविषारी साप, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार याबद्दल सचित्र माहिती देण्यात येणार आहे. याचा सर्व वाचकांनी लाभ घ्यावा.
चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सिरीयल न्युज अध्यक्ष उपाध्यक्ष संपादक व सर्व सदस्य.*

No comments:

Post a Comment