चंदगड व बेळगाव भागातील पाणीप्रश्नासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार राजेश पाटील , सोबत कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी |
तेऊरवाडी ( संजय पाटील )
मागील वर्षी कोल्हापूर सांगली व सातारा या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मूळे महापूर आलेला होता तर काही ठिकाणी जिवीतहानी व मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची हानी झालेली होती. याचाच भाग म्हणून यावेळी मान्सूनच्या काळात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील व कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचे अध्यक्षतेखाली दोन्ही राज्याचे मंत्री सचिव व जलसंपदा खात्याचे प्रमुख अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राकसकोप धरणामुळे तुडये व मळवी गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीचे नुकसान होत आहे , तुडये व शेजारील गावकऱ्यांची जमीन अगोदरच तिलारी धरणात गेली आहे .पण राकसकोप धरणातील वाढीव पाण्यामुळे पुन्हा तुडये व परिसरातील गावकऱ्यांच्या जमीनचे नुकसान होत आहे. राकसकोप धरणातील गाळ काढावा म्हणजे मुबलक पाणी साठा वाढेल व जमिनीचे नुकसान होणार नाही अथवा नुकसानग्रस्त असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करून आताच्या बाजार भावानुसार त्याची पाच पट रक्कम शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली.
तसेच तिलारी धरणावरचे तीन प्रलंबित बंधारे लवकर बांधून त्याचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी चंदगड मधील दहा ते पंधरा गावासह सीमाभागातील गावांना मार्कंडेय नदीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने एकत्र येऊन संयुक्त करार करावा व निधी उपलब्ध करावा. वीज निर्मिती ही बाकीच्या माध्यमातून तयार करता येते पण तिलारी धरणाचे पाणी वीज निर्मिती साठी न वापरता ते पाणी शेतकऱ्यांना मिळाले तर त्यांची जास्त प्रमाणात प्रगती होईल यासाठी दोन्ही सरकारने लवकर सकारात्मक प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
या मागण्या लक्षात घेऊन कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी लवकरच कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील , बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके व चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांची बेळगाव येथे यासंदर्भात बैठक घेऊ असे जाहीर केले. या बैठकीस कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी , मंत्री न श्रीमंत पाटील, स्लम बोर्ड अध्यक्ष महेशकुमार कुमटल्ली ,अपर मुख्य सचिव जलसंपदा राकेश सिंग हे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील , सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील , राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील ,राज्यमंत्री नामदार विश्वजित कदम,खासदार संजयकाका पाटील,खासदार धैर्यशील माने,आमदार विक्रम सावंत हजर होते.
No comments:
Post a Comment