भात रोपे लावणीचे प्रात्यक्षित दाखवताना कृषि विभागाचे अधिकारी व सोबत शेतकरी वर्ग. |
कोवाड / सी एल वृत्तसेवा (संजय पाटील )
ग्रामीण भागामध्ये होणारा कोवीड 19 चा शिरकाव लक्षात घेता संपूर्ण खेडी भीतीच्या छायेखाली आहेत.अशा परिस्थितीत देखील शेतकरी वर्ग आपल्या शेतातील कामे करण्यात गुंतला आहे.
सध्या कोरोनाच्या संकट काळात देखील महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्याबरोबरच शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे.याचाच एक भाग म्हणून तालुका कृषि अधिकारी गडहिंग्लज यांचे वतीने 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत साजरा करण्यात येणाऱ्या कृषि संजीवनी सप्ताह कार्यक्रम, क्रॉपसॅप अंतर्गत मौजे डोनेवाडी,हडलगे,सांबरे,कुमरी,यमेहट्टी, सावतवाडी तर्फ नेसरी,अर्जुनवाडी, कान डेवाडी,काळामवाडी ,तारेवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात रोपांच्या लावणीचे प्रात्यक्षित दाखवून शेती शाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले.
शेतकरी राजा आगामी खरीप हंगामासाठी आंतरमशागत करून सज्ज झाला आहे.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेअतर्गत येणाऱ्या कृषि सेवा केंद्रावर होणारी गर्दी टाळता येऊन होणारा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या पुढाकाराने शेतकरी गट व कृषि सेवा केंद्र यांचेमार्फत शेतकऱ्याना थेट त्यांच्या बांधावर जाऊन मागील काही दिवसात बियाणे, खते व औषधें वाटप करण्याची योजना आखली होती.याच माध्यमातून गडहिंग्लज तालुक्यातातील तारेवाडी, यमेहट्टी, काळामवाडी आणि तावरेवाडी यासह अनेक गावात हा उपक्रम राबविला होता.
शेतकरी वर्गाचा विचार करता यापुढे देखील अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हाती घेणार असल्याचे तालुका कृषि अधिकारी पी.पी.पाटील यांनी सांगितले. सुरुवातीला कृषि सहायक सचिन नाईक यांनी प्रास्ताविक केले.महागाव चे मंडळ कृषि अधिकारी हरिदास बोगे यांनी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.कृषि पर्यवेक्षक एम. डी.पाटील यांनी खरीप हंगामातील भात,भुईमूग,नागली यासह ईतर पिकावर पडणाऱ्या रोग व किडिंचा बंदोबस्त कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी मंडळ विभागातील सर्व कृषि सेवक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment