फुरसे (saw scaled viper) |
घोणस सारखा दिसणारा हा एक मंडली सर्प आहे. याची सरासरी लांबी अर्धा मीटर असते. याचे शास्त्रीय नाव एकिस कॅरिनेटस असे आहे. याचा रंग तपकिरी, बदामी असून त्यावरील खुणा अधिक गडद किंवा काळसर असू शकतात. कधीकधी पाठीच्या मध्य रेषेवर चौकोनी ठिपक्यांची ओळ असते. बसताना वेटोळे घालून बसतो व सरपटताना इंग्रजी एस आकाराप्रमाणे उड्या घेत जाऊ शकतो (असे चालणारा साप खात्रीशीर फुरसे समजावा). फुरसे हा साप सुद्धा घोणस प्रमाणे अंडी न घालता पिल्लांना जन्म देतो. साधारणपणे जुलै महिन्यात मादी पिलांना जन्म देते. भारतात सर्वत्र आढळणारा फुरसे साप रेताड मैदानी प्रदेशात, ओसाड जमिनीच्या ठिकाणी दगडांखाली राहतो. महाराष्ट्रातील कोकण विभागात मोठे जंगल नसलेल्या उंच ठिकाणी, गड किल्ल्यांवर याचा रहिवास जास्त आहे. फुरसे हा कमी लांबीचा विषारी साप आहे. याची लांबी ४० ते ७५ सेंटीमीटर पर्यंत असते. डोके त्रिकोणी व त्यावर पांढरी बाणासारखी खूण असते याचे विषाचे दात काहीसे लांबट असतात. याचा स्वभाव चिडखोर असून किंचित जरी डिवचले तरी तो चिडतो यावेळी आपले शरीर तो इंग्रजी 8 अंका सारखे करून एकमेकावर घासतो यावेळी खस खस आवाज येतो. चिडलेल्या वेळी समोर दिसेल त्या पदार्थाचा किंवा प्राण्याचा चावा घेतो. अत्यंत चपळ असल्यामुळे केव्हा दंश करतो हे चावलेल्याला कळत सुद्धा नाही. त्याच्याकडे लक्ष गेले नाही तर तो पुन्हा पुन्हा चावा घेतो. हा साप लहान असला तरी नाग आणि घोणस पेक्षाही याचे विष जहाल असते. तथापि याचा आकार लहान व विषाचे प्रमाणही दंश झालेल्या प्राण्यात कमी प्रमाणात उतरल्यामुळे तात्काळ प्रभाव दिसून येत नाही. याच्या विषाचा परिणामही घोणस प्रमाणेच रक्ताभिसरण संस्थेवर होतो. बऱ्याच वेळेला चावलेला अवयव गॅंगरीन होऊन निकामी होतो. त्यामुळे ग्रामीण भागात याला 'कुसडा' साप असेही संबोधले जाते. योग्य उपचार न झाल्यास २४ तासात रुग्ण दगावू शकतो. छोटे साप बेडूक, सरडे, पाली, विंचू, किडे हे याचे खाद्य आहे.
सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर
शब्दांकन* :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment