संपादकीय - आपतकालीन काळात जीवाची बाजी लावणारा पत्रकार सामाजिक, राजकीय व शासकीय यंत्रणेकडून आजही दुर्लक्षित - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

संपादकीय - आपतकालीन काळात जीवाची बाजी लावणारा पत्रकार सामाजिक, राजकीय व शासकीय यंत्रणेकडून आजही दुर्लक्षित


                                     संपादकीय
                 
       जगभरात कोरोना महामारीचा आगडोंब उसळला आहे. त्याचा प्रसार अगदी चंदगड  तालुक्यातील वाडीवस्ती, गावात घरापर्यंत पर्यंत पोहोचला आहे. २२ मार्च ते ३० जुलै पर्यंत पाच महिन्यांचा कालखंड आपण पहात आहोत. गल्ली पासून दिल्ली पर्यत कोरोना आपत्ती मुळे घडलेल्या घटनांची माहिती प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्तुनिष्ठ बातमी विविध माध्यमांकडे पाठवून कोरोनाची इत्थंभूत माहिती जनतेला घरबसल्या करून देत असतो. तो विविध माध्यमाचा बातमीदार म्हणजेच पत्रकार. 
                तेऊरवाडी सारख्या अडवळणी जंगलात लाॅकडाउनमध्ये अडकलेल्या मध्य परदेशातील आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडून शासकीय यंत्रणेला जागे करण्याचे काम करून त्यांना त्यांचे घरी पोहचविणेसाठी प्रयत्न  केले ते चंदगड न्यूज लाईव्हच्या टीमने  त्यांची व्यथा वेळीच मांडली नसती तर हि आदिवासी कुटुंबे अजूनही किती दिवस उन्हा पावसात तळमळत राहिली असती कोण जाणे. 
   पत्रकार हा केवळ सामाजिक बांधिलकी म्हणुन स्वतःचे घरदार संसार सोडून प्रथम रस्त्यावर उतरतो, घडलेल्या घटनेचे चित्रण करून अशा कठीण प्रसंगात  आपत्तीग्रस्तांच्या वेदना शासनापर्यत पोहचवत असतो, यासाठी शासन व जनता यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य म्हणुन करीत असतो.
         गेल्या वर्षी आलेल्या महापूरात सर्व माध्यमाची संपर्क यंत्रणा कोलमडली होती, कोठे काय घडत होते हे कोणाला कळणेही अवघड झाले होते, अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना रोजच्या घडामोडी पोहोचविण्यासाठी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या लाईव्ह माध्यमातून जनतेला तालुक्यातील प्रत्येक ठिकाणची सद्यस्थिची दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.  कशाची ही तमा न बाळगता लाईव्हची टीम कार्यरत राहीली. गेल्याच महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचे वार्ताकन करण्यासाठी वादळ व पावसात ऑंखो देखा हाल आयबीएनचे संदिप राजगोळकर यांचे उदाहरण देता येईल. त्यानीही लोकमत 18 च्या माध्यमातून हे काम केले. 
         तसेच अनेक न्युज चॅलनचे व वाहिनीचे प्रतिनिधी अंगावर शहारे आणणारे वृत्त देत होते. आपण बंदिस्त हाॅलमध्ये बातम्या पहात होतो. कोरोनाची बातमी संकलन करणाऱ्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. मात्र ते बरे झाले. परंतु जीव धोक्यात घालून समोर असलेल्या मृत्यू सोबत तडजोड करून दिलेले योगदान मोठे आहे. हे सर्व धोके लक्षात घेऊन पत्रकार रात्रंदिवस आपले काम करत असतो. त्याने दिलेल्या चांगल्या बातमीचे कोण कौतुक करीत नाहीत. मात्र एखादी बातमी चुकली तर रोषाचा धनी ठरतो. मोठ्या दैनिकाचा किंवा छोट्या दैनिकाचा प्रतिनिधी असो त्याला चांगले आर्थिक पॅकेज मिळणे नशिबात नसते. त्याना आर्थिक स्वास्थ्य नसते. शासन, राजकीय लोक, समाज यांच्याकडून बराच वेळा चांगले कार्य करणाऱ्या पत्रकारांची दखल घेतली जात नाही. हि आजवरची शोकांतिका आहे. यामुळेच माध्यमामध्ये काम करण्यासाठी  नवीन पिढी पुढे येत नाही, हि वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. 
       महाराष्ट्र शासनाने पत्रकारासाठी अनेक योजना जाहिर केल्या आहेत. शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावयाचा असेल तर महत्वाची अट म्हणजे अधिस्वीकृती पत्राची किंवा तो पत्रकार संबंधित वृत्तपत्राकडे पुर्ण वेळ काम करणारा असावा. या अटीमुळे अनेक पत्रकार अपात्र ठरत आहेत. मग त्यांना शासकिय योजनांचा फायदा काय. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना धमकावणे त्रास देणे या विरोधात पत्रकार संरक्षण कायदा केला आहे. आता या प्रकाराला आळा बसत आहे,  असे वाटते. 
   लाॅकडाउन सुरू झाले. वाहतुक थांबली. काही दैनिकांचे प्रकाशन बंद झाले. जाहिराचा ओघ कमी झाला. त्याचा परिणाम अनेक वृत्तपत्रानी आपल्या आवृत्ती बंद केल्या तर काहीनी जिल्हा कार्यालये बंद केली. या मालकशाहीच्या निर्णयामुळे  अनेक पत्रकारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. पगार मिळाले नाहीत. नोकरी गेली, त्याची साधी चौकशी सुध्दा कोणी केली नाही. 
    एका बाजूला निष्ठेने काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठी आहे. तर दुसरीकडे भुरट्या पत्रकाराची संख्या वाढत आहे. काही जण स्वतःला प्रसिध्दी मिळवण्यासाठी अशा भुरट्यांना हाताशी धरुन वाटेल त्या बातम्या फेकत असतात. यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या पत्रकारांना दोष लागत आहे. अशा घटना आपल्या तालुक्यात घडल्या आहेत. पत्रकारांना या व्यवस्थेतेतून जाताना प्रशासन किंवा राजकीय लोकं आपला वापर करून घेत असतात. या घटनांचा विचार करत, पत्रकारांनी आता दक्ष राहिले पाहिजे. कोणाचे मांडलीकत्व न स्विकारता जनतेचा कैवारी म्हणून काम  करत राहिले पाहिजे "लोकांतुन  म्हंटले जाते की पत्रकार हा सर्वाचा आहे" हे जरी खरे असले तरी पत्रकारांना कोणाचा आधार नाही असे वाटू नये. यासाठी  समाजानेही पत्रकारांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. समाजही पुढे आला पाहिजे. पत्रकारनेही घटनेतील चौथ्या आधारस्तंभाला अधिकाधिक  बळकटी आणली पाहिजे.
                                                           उदयकुमार देशपांडे,  दाटे

No comments:

Post a Comment