पारगड वर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2020

पारगड वर येणाऱ्या पर्यटकांना रोखण्याची मागणी

चंदगड : सी एल वृत्तसेवा
           कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्र शासनामार्फत तो ३१ जुलै पर्यंत वाढवला आहे. यामुळे गडहिंग्लज उपविभागातील रामतीर्थ धबधबा, सामानगड आदींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, मंदिरे बंद आहेत. तथापि चंदगड तालुक्यातील सिंधुदुर्ग, गोवा हद्दीवर वसलेला ऐतिहासिक किल्ले पारगड याला अपवाद ठरत आहे.
            पारगड वर पर्यटकांचा ओघ निरंतर सुरूच आहे. गडाच्या खाली आलेल्या पर्यटकांना रोखल्यास ते ग्रामस्थांशी हुज्जत घालत आहेत. हे पर्यटक गडापर्यंत येऊ नयेत यासाठी चंदगड चे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वनविभाग यांनी प्रशासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करावी‌. अशी मागणी किल्ले पारगड कोरोना दक्षता कमिटीचे अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केली आहे. कारण पारगड, इसापूर, मिरवेल, नामखोल, तेरवण या दुर्गम परिसरात कोरोनाचा संसर्ग झाला; तर जवळपास कुठलीच वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे सुरक्षित राहणे हेच या लोकांसाठी महत्त्वाचे आहे. 
           पर्यटकांसाठी किल्ला बंद असल्याचे फलक मोटणवाडी, हेरे, चंदगड, पाटणे फाटा आदी ठिकाणी तात्काळ लावणे गरजेचे आहे कारण पंचवीस तीस किलोमीटर जंगलातुन किल्ल्याच्या पायथ्याशी आलेल्या पर्यटकांना पायऱ्यांत अडवल्यास त्यांचा हिरमोड होऊन ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. व वादाचे प्रसंग उद्भवतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोरोना महामारी च्या काळात विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी पर्यटकांना रोखणे गरजेचे आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पारगड ग्रामस्थ, दक्षता कमिटी व पंचक्रोशीतून होत आहे.


No comments:

Post a Comment