किल्ले पारगड |
यापूर्वी कधीच डासांचा प्रादुर्भाव नसलेल्या किल्ले पारगड या उंच ठिकाणी यावर्षी डासांची मोठी उत्पत्ती दिसून येत आहे. अन्य डासां प्रमाणेच चिकुनगुनिया चे डास मोठ्या संख्येने दिसत आहेत. यामुळे ग्रामस्थ व पर्यटकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी शासनस्तरावरून स्वच्छता व औषध फवारणी मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. उष्णता व पाणी यामुळे डासांच्या उत्पत्तीला वातावरण पोषक ठरले आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्च पासून दहा जून ला पाऊस सुरू होईपर्यंत येथे मोठी पाणी टंचाई होती. सर्वच विहीरी व तलाव कोरडे पडले होते. त्यामुळे पाणी साठवणूकीकडे ग्रामस्थांचा कल होता. वयोवृद्ध ग्रामस्थांनी यातील बरेच साठे अजूनही कोरडे केले नसण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांनी किल्ल्यावर इतस्ततः टाकलेल्या काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या ग्लास यात पाणी साठून डासांच्या उत्पत्तीस वाव मिळत आहे. दुसरीकडे गडावर दरवर्षी पावसाळ्यात अखंड सोसाट्याचा वारा वाहत असतो; यामुळे डास उडून जातात तथापि यावर्षी वाऱ्याचे प्रमाणही कमी असल्यामुळे झाडाझुडपात निवार्याला बसलेले डास तसेच आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दलदलीच्या ठिकाणी या भागात 'कानीट' नावाचे रक्तपिपासू जळू असते. यांची जुलै नंतर प्रचंड संख्येने वाढ होते. तत्पूर्वी स्वच्छता मोहीम औषध फवारणी व्हावी अशी मागणी होत आहे. कोरोना महामारी च्या काळात डासांद्वारे पसरणाऱ्या डेंगू, चिकनगुनिया, टायफाईड या जीवघेण्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपायोजना अत्यावश्यक आहे.
No comments:
Post a Comment