लॉकडाऊन काळातील वीज बिले महावितरण'ने माफ करावीत, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

06 July 2020

लॉकडाऊन काळातील वीज बिले महावितरण'ने माफ करावीत, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांची मागणी

भरमूआण्णा पाटील
कार्वे / प्रतिनिधी
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. या काळात सर्वच सरकारी कार्यालय बंद होती. चंदगड विभागातील शेतकऱ्यांची वीज बिले मात्र रीडिंग न घेता भरमसाट प्रमाणात देण्यात आली आहेत. ही वीज बिले कशी भरावी या विवंचनेत येथील ग्राहक आहे. त्यामुळे कोरोना महामारी  काळातील संपूर्ण वीज बिले माफ करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही मागणी केली आहे.
       महावितरण कंपनीने या महामारीच्या  कालावधीत मीटर रीडिंग घेणे बंद केले होते. त्यामुळे मागील वर्षाचे सरासरी रीडिंग पाहून बिले देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता अंदाजे बिले देऊन कोरोना महामारीत त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. दरवाढीचे कारण पुढे करून अन्यायी वाढ केल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना महामारी  कालावधी मध्ये वास्तविक वीज वापर इतर कालावधी पेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे हा अन्याय जनता कदापि सहन करणार नाही. ग्राहकांच्या रोषाला महावितरण कंपनीला सामोरे जावे लागेल. सरकारच्या इतर विभागात गोरगरीब जनतेला विविध सूट मिळत असताना महावितरण कंपनीमार्फत इतका मोठा अन्याय का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारी पातळीवर याचा विचार होऊन सर्वच ग्राहकांची वीज बिल माफ होणे गरजेचे आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ही बिले भरणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय घेऊन लॉकडवून काळातील संपूर्ण वीज बिले माफ करावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

No comments:

Post a Comment