अस्वलाच्या हल्यात तरुण गंभीर जखमी, गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवले - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

अस्वलाच्या हल्यात तरुण गंभीर जखमी, गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवले

संग्रहित छायाचित्र
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
      शेताकडून घरांकडे जात असताना पिळणी गावच्या मागील बाजुस शेताकडे जाणाऱ्या पांणद रस्त्यावर अचानकपणे अस्वलाने हल्ला केल्याने उत्तम तुकाराम गावडे (वय-38, रा. पिळणी, ता. चंदगड) हे गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री दहा वाजता हि घटना घडली. 
       यासंदर्भात वनविभागातून मिळालेली माहीती अशी - रविवारी रात्री दहाच्या दरम्यान उत्तम गावडे व त्यांचा मोठा भाऊ सुरेश गावडे हे दोघे आपल्या शेताकडून रात्रीच्या वेळी घराच्या दिशेने निघाले होते. यावेळी पिळणी गावच्या मागील बाजुस शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर अचानकपणे अस्वलाने उत्तम यांच्यावर हल्ला केला. यामध्ये उत्तम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर लगेचच त्यांना तातडीने चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णांलयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 
       वन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनास्थळी अस्वलाच्या पाऊलखुणा तसेच पाणंद रस्त्यावर अस्वलाची विष्ठा दिसून आली आहे.  रस्त्यालगत फणसाची झाडे असून अस्वल फणस खाण्यासाठी आले असल्याची शक्यता असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले तसेच घटनास्थळी फणसाचे झाडावर अस्वलाचे पायाने व नखाचे ओरखडे दिसून आले आहेत .वन विभागाकडून जखमी व्यक्तीस तत्काळ स्वरूपाची औषध उपचारासाठी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली असून शासन निर्णयाप्रमाणे पुढील नुकसानभरपाईसाठी तात्काळ प्रकरण मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अस्वलांचा वावर असलेल्या भागात लोकांनी एकटे दुखटे न फिरता गटागटात फिरावे हातात काठी बाळगावी रात्रीच्या वेळी बॅटरी बरोबर ठेवावी अचानक अस्वल दिसल्यास जोरात हातवारे करून व  आवाज करावा जेणेकरून अस्वलास आकाराने मोठे व जास्त आवाज करणारे काही असल्याचा भास होऊन ते निघून जाईल असे वनक्षेत्रपाल डी.जी राक्षे यांनी सांगितले. घटनास्थळी ए. वाजे वनपाल कानूर खुर्द ,के .शिरसाट वनरक्षक पिळणी व कानूर खुर्द परिमंडळ मधील वनमजुर यांनी जाऊन पाहणी व पंचनामा केला स्थानिक नागरिक लक्ष्मण चव्हाण उपसरपंच पीळणी, पांडुरंग आप्पा गावडे,पोलीस पाटील, मधुकर काशिराम गावडे यांनी जखमी व्यक्तीस तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सहकार्य केले.
                                                        बातमीदार - संपत पाटील, चंदगड


No comments:

Post a Comment