चंदगडात पावसाची उघडीप, धरणांतील पाणीसाठा ८२.७७ टक्के; सरासरी पाऊस ८५६ मिमी - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

चंदगडात पावसाची उघडीप, धरणांतील पाणीसाठा ८२.७७ टक्के; सरासरी पाऊस ८५६ मिमी

आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
               आठवडाभर संततधार नंतर चंदगड तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज सोमवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासात तालुक्‍यात सरासरी केवळ तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तीन मध्यम व १६ लघुपाटबंधारे  प्रकल्प ८२.७७ टक्के भरले असून पाणीपातळीत संथ वाढ सुरू आहे. यातील घटप्रभा- फाटकवाडी व झांबरे-उमगाव हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने ८ जुलै पूर्वीच भरले असून जंगमहट्टी ६१ टक्के भरला आहे. लघुपाटबंधारे पैकी कळसगादे व सुंडी प्रकल्प १७ जुलैपूर्वी शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित  प्रकल्पापैकी आज अखेर झालेला पाणीसाठा आंबेवाडी ८१.१३, दिंडलकोप-६८.९०, हेरे-६६.२६, जेलुगडे-९६.९३, करंजगाव-४२.५७, खडक ओहोळ-३३.३१, किटवाड नं. १- ६४.११, किटवाड नं. २- ६६.२५, लकीकट्टे-८०.०६, निटुर नंबर १- ४७.४९, निटुर नं. २- ४७.२१, पाटणे-९७.४८,  काजिर्णे-८७.८१ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
         तालुक्यात पावसाचा जोर अधिक नसला तरी सातत्य टिकून आहे. सोमवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड २ (१०५८), नागणवाडी ६ (८६७),  माणगाव १ (२४८), कोवाड ५ (४४८),  तुर्केवाडी २ (८३९), हेरे ३ (१६८०), चोवीस तासातील एकूण पाऊस १९ तर सरासरी  ३ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस ५१२१ तर सरासरी पाऊस ८५३ मिलिमीटर इतका झाला आहे. तालुक्यात आज नागणवाडी व कोवाड येथे ६ व ५ तर माणगाव मध्ये केवळ एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाची उघडझाप शिवारातील सर्वच पिकांना पोषक ठरत आहे. दरम्यान आज दुपारी एक ते दोन च्या दरम्यान चंदगड पूर्व कर्यात भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली यामुळे शेतीकामात काही वेळ व्यक्ती आला.
          कोरोना रोगाचा वाढता कहर लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांचेमार्फत जिल्ह्यात सात दिवस कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तथापि पावसाच्या उघडीपिमुळे काही बिनकामे विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते.

No comments:

Post a Comment