कोवाड येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील व कार्यकर्ते. |
कोरोना महामारी च्या काळात मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांना मनमानी बिले देऊन महावितरण कडून ग्राहकांची पिळवणुक सुरू आहे. हे न थांबल्यास महावितरण वर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना कोवाड विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनी बाबत घरगुती, औद्योगिक व शेतकरी ग्राहक यांच्या शेकडो तक्रारी येत आहेत. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच वीज वितरण कंपनी कार्यालयांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कोवाड येथे वीज कार्यालयाला दिलेल्या निवेदनात ग्राहकांची वीज बिले माफ करावी किंवा दिलेल्या चुकीच्या बिलात दुरुस्त्या करून सूट द्यावी. चार महिन्याची एकत्रित बिले देण्याऐवजी प्रत्येक महिन्याचे स्वतंत्र बिल देण्यात यावे. ज्या ग्राहकांनी बिले भरली आहेत त्यांच्या बिलात तात्काळ सुधारणा करावी. गावोगावी वीजवाहिनी खांब गंजून मोडकळीस आले आहेत ते तात्काळ दुरुस्त करावेत. वादळांमुळे पडलेले खांब उभारणीसाठी ग्राहकांकडून पैसे घेऊ नयेत; घेतले असल्यास तात्काळ परत करावेत. ही सर्व कामे सात ऑगस्ट च्या न झाल्यास वीज मंडळ कार्यालयात मनसे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर मनसे उपजिल्हाध्यक्ष विवेक पाटील व पदाधिकार्यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना विवेक पाटील, अमर कांबळे, सत्वशील पाटील, सुरज धाटुंबे, संभाजी मनवाडकर, तुकाराम पाटील, अमोल प्रधान, रवी मनगुतकर, प्रकाश सुतार, उत्तम सुर्वे, चेतन वांद्रे, राजाराम वांद्रे, संग्राम वांद्रे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment