चंदगड लाईव्ह (सी. एल. न्यूज) न्युज चॅनेलच्या वाचकांसाठी विविध
विषारी व बिनविषारी सापांची माहिती देणारी मालिका सुरू केली आहे. या मालिकेतील दुसरा साप आहे मण्यार.
मण्यार (common krait) मण्यार साप हा रंगाने निळसर काळा असून त्यावर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि पट्ट्यामुळे तो तात्काळ ओळखता येतो. डोक्याचा आकार त्रिकोणी असतो. तो अंडी घालतो पिल्लांची लांबी २५ सेमी तर पूर्ण वाढ झालेल्या मण्यारची लांबी एक ते सव्वा मीटरपर्यंत असते. या सापाचे विष नागाच्या विष्याच्या तिपटीपेक्षा अधिक तीव्र व जहाल असते. मण्यार च्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर तात्काळ होतो. त्यामुळे मेंदूचे कार्य अनियंत्रित होते. श्वासोच्छवासात आडथळे येणे, पोटदुखी, घसा कोरडा पडणे, चावा घेतलेला प्राणी बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसतात. तातडीने उपचार न झाल्यास मृत्युमुखी पडतो. मन्यार साप हा भारतात सर्वत्र आढळतो. मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार-पाच प्रमुख विषारी सापांपैकी (नाग, घोणस, मण्यार, फुरसे, चापडी) एक जात आहे. हा साप निशाचर असून रात्रीच्या वेळेला भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्पदंश झाल्यास मण्यारचा दंश असण्याची शक्यता बळावते. याचे वास्तव्य पडकी घरे, लाकूड फाटा ठेवलेल्या अडगळीच्या ठिकाणी अधिक असते. बाहेर अति थंडी असेल तर उबदारपणासाठी तो घरात, संडास, बाथरूम अशा ठिकाणी घुसतो. किंवा बाहेर अतिउष्ण वातावरण असेल तरीही थंडाव्यासाठी घरांचा आसरा घेतो. याचे मुख्य अन्न नागा प्रमाणे उंदीर, बेडूक, पाली, सरडे व छोटे साप असेच आहे.
संकलन व लेखन :- श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड जि. कोल्हापूर) मोबाईल नंबर - 9423270222
सहकार्य :- सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील (सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी), तानाजी वाघमारे (उपाध्यक्ष- शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी), भरत दत्तात्रय पाटील (सेवानिवृत्त डीएफओ- कोल्हापूर)
No comments:
Post a Comment