सी. एल. न्यूज च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग- ३. घोणस (Russell's viper) - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2020

सी. एल. न्यूज च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग- ३. घोणस (Russell's viper)

                                                         घोणस 

             घोणस या सापाचा रंग बदामी अथवा तपकिरी असतो. बहुतेक घोणसाचे अंग तेथील जमिनीच्या रंगाशी मिळतेजुळते असते. पूर्ण वाढ झालेल्या घोणसची लांबी एक ते दोन मीटरपर्यंत असते. अंगावर लंबवर्तुळाकार काळे-करडे चट्टे आढळतात‌. याचे डोके त्रिकोणी, मधला भाग जाड शेवटी निमुळता होत गेलेला असतो. याच्या जबड्यात वरील बाजूस दोन मोठे दात असतात. चावा घेण्याच्या वेळी ते बाहेर काढतो. गरज नसेल तेव्हा ते जबड्याच्या वरील भागातच लपलेले असतात. एरवी बोजड वाटणारा घोणस भक्ष्यावर अत्यंत चपळाईने ( सेकंदाच्या नव्या भागात) हल्ला करतो. चिडलेल्या व भीतीच्या प्रसंगी तो तोंडाने फुस्सऽऽ फुस्सऽऽ असा कुकरच्या शिट्टी सारखा आवाज (फुत्कार) काढतो. घोणस सापाचे विष अतिशय जहाल असते. हे विष मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करते. त्यामुळे चावलेल्या जखमेतून मोठा रक्तस्राव सुरू होतो. तात्काळ उपचार न झाल्यास रुग्णाच्या नाक, कान, तोंड, गुदद्वार यातून रक्त स्त्रवू लागते. नाग सर्प दंशावेळी आपण जखमेवर पट्टी बांधतो तशी पट्टी यावेळी बांधू नये. असे केल्यास रक्त साकळून तो अवयव निकामी होऊ शकतो. घोणस साप अंडी घालत नसून ती पोटातच उबवून एकाच वेळी 30 ते 50 पिलांना जन्म देतो. पूर्ण वाढ झालेला मोठा घोणस अजगरासारखा दिसतो त्यामुळे  काही लोक याला सकृतदर्शनी अजगरच समजतात. हा भारतात सर्वत्र आढळतो; जंगल व झाडाझुडपातील बिळात, कपारीत राहतो. अशा ठिकाणी सध्या राष्ट्रीय पक्षी मोरांची संख्या वाढली आहे त्यांच्या भितीने घोणस सह बरेच साप मानवी वस्तीच्या दिशेने येऊ लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. घोणस, नाग, मण्यार आदी विषारी सर्पदंश झाल्यानंतर रुग्णास तात्काळ; शक्यतो शासकीय रुग्णालयात हलवावे.

सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी व शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

                                                                      शब्दांकन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुंद्री.

No comments:

Post a Comment