स्वातंत्रदिनी हेरे व मोटणवाडी येथे जिल्हाधिकारी देसाई व आमदार पाटील यांच्या हस्ते होणार वर्ग १ उताऱ्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2020

स्वातंत्रदिनी हेरे व मोटणवाडी येथे जिल्हाधिकारी देसाई व आमदार पाटील यांच्या हस्ते होणार वर्ग १ उताऱ्यांचे वाटप

चंदगड (प्रतिनिधी) : 
          हेरे सरंजाम वतनांचा भुधारणा वर्ग २ कमी करून भुधारणा वर्ग १ करण्यात आले आहे. त्या ७/12 चे वाटप जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई व आमदार श्री. राजेश पाटील यांच्या हस्ते केले जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मौजे मोटणवाडी व हेरे या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम होणार असून उर्वरित गावांमध्ये त्या ठिकाणच्या संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या हस्ते एकाच वेळी या दाखल्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती चंदगड तहसिलदार विनोद रणवरे यांनी प्रसिद्धीपत्रताद्वारे दिली.
          चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम वतनाची जमिन असणारी एकूण ५४ गावे आहेत. सदर गावांमध्ये वहिवाटदारांना जमिनीचे वाटप झालेले आहे. त्यावेळी सदर जमिनीचा भूधारणा प्रकार वर्ग १ झालेले नसल्याने सोसायटी, बॅंक यांच्याकडून कर्ज घेणेस अडचणी येत होत्या. त्या लक्षात घेवून जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांनी उपजिल्हाधिकारी व चंदगड, गडहिंग्लज, आजरा व भूदरगड तालुक्यातील तलाठी यांच्या पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट २०२० या कालावधीत या प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार आकाराच्या दोनशे पट रक्कम संबधित खातेदारांकडून भरुन घेवून आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेशानुसार जमिन भुधारणा वर्ग २ कमी करून भूधारणा वर्ग १ करण्यात आले. त्या सर्व दाखल्यांचे वाटप जिल्हाधिकारी देसाई व आमदार पाटील यांच्या हस्ते उद्या (१५ ऑगस्ट रोजी) करण्यात येणार आहे. तरी सदर सर्व गावांमध्ये एकाच वेळी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या हस्ते या दाखल्यांचे वाटप होणार असल्याची माहिती तहसिलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


No comments:

Post a Comment