सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ८ प्रश्नोत्तरे / शंका समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : ८ प्रश्नोत्तरे / शंका समाधान

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्यूज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका, भाग : ८
                                   
ढोलगरवाडी सर्प शाळेतील नागसापासह सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील.
                                   
                                     प्रश्नोत्तरे / शंका समाधान
 प्रश्न :- सापाच्या अंगावर केस असतात; असे म्हटले जाते? 
 उत्तर :- नाही! देवाच्या? किंवा फार जुन्या सापाच्या अंगावर केस असतात असा गैरसमज आहे. सापाच्या अंगावर केस असते तर साप म्यान टाकतो त्यावेळी ते केस म्याने वर दिसले असते. सापाची लहान पिल्ले सुरूवातीला आठ दिवसातून एकदा म्यान टाकतात. साप जसा प्रौढ होईल तसा एक महिना, दोन महिने, चार महिने काहीवेळा सहा महिन्यातून एकदा म्यान टाकतो. पण कुठल्याच म्यानेवर अद्याप केस दिसले नाहीत. आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ साप म्यानेवाटे बाहेर टाकतो. काही वेळेला दगडाला घासून म्यानेचे तुटके अवशेष केसा सारखे दिसू शकतात.  गारुडी किंवा तत्सम लोक भाविकांची/लोकांची दिशाभूल करून पैसे उकळण्यासाठी सापाच्या अंगावर  केस चिकटवू शकतात. निसर्गतः सापाच्या अंगावर केस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्न :-  साप मधुर संगीताच्या तालावर डोलतो, हे खरे आहे का?
 उत्तर :- नाही! हासुद्धा एक गैरसमज आहे. सापाला मुळात कान हा अवयवच नाही. त्यामुळे त्याला गीत, संगीत (नागिन की धुन) ऐकू येण्याचा प्रश्नच येत नाही.  नाग समोरील हलणारी वस्तू किंवा गारुडी ची पुंगी जशी हालेल तसा त्या वस्तूला दंश करण्याच्या इराद्याने इकडे तिकडे हालत असतो. तेव्हा तो पुंगी च्या तालावर डोलतो असा समज होतो. इतर वेळी कंपन ज्ञानाच्या आधारे त्याला अन्य प्राण्यांची चाहूल लागताच तो सावध होतो. पण कुठल्याच सापाला श्रवणेंद्रीये नाहीत.

 प्रश्न :- नागाच्या डोक्यावर (फण्यावर) नागमणी असतो काय?
 उत्तर :- नागाच्या डोक्यावर नागमणी असतो, ही पूर्णतः काल्पनिक कथा आहे. ढोलगरवाडी सर्प शाळेच्या माध्यमातून सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर व माझ्यासह शाळेतील अन्य शिक्षक व विद्यार्थ्यांनी गेल्या साठ वर्षांत सुमारे लाखभर नाग साप पकडले असतील तथापि आम्हाला नागमणी असलेला एकही साप निदर्शनास आलेला नाही. (आम्ही सुध्दा या कथित नागमणी वास्तवाच्या शोधात आहोत.)

सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी व शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  मा. तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर
                                                                          *शब्दांकन* :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुंद्री प्रतिनिधी


No comments:

Post a Comment