कोल्हापुरात होणार कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून होकार - चंदगड लाईव्ह न्युज

02 August 2020

कोल्हापुरात होणार कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून होकार

                                                                  संग्रहित छायाचित्र
मजरे कार्वे/प्रतिनिधी (सी एल न्यूज)
           कोरोनाने जगभर हाहा:कार उडवला असताना त्यावरील लसीचे संशोधन सुरू आहे. देशात कोव्हॅक्सीन ही लस तयार झाली आहे. या लसीची मानवी चाचणी गेल्या सप्ताहात सुरू झाली. दुसऱया टप्प्यात देशातील 13 ठिकाणी या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. राज्यातील दोन केंद्रात कोल्हापूर आणि नागपूर आहे. कोल्हापूर जिल्हय़ात 100 जणांवर या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी सोमवारपासून नोंदणी केली जाणार आहे.

         कोरोनाने जगभर लाखो लोकांचा बळी गेला आहे, लाखो लोक उपचार घेत आहेत. विकसित अन् विकसनशील देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे संशोधन सुरू आहे. भारतातही कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती झाली आहे. मानवावर या लसीची चाचणी घेण्यास अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये गेल्या सप्ताहात सुरूवात केली आहे. या कोव्हॅक्सिनची दुसऱया टप्प्यात देशातील 13 ठिकाणी मानवी चाचणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये राज्यातील कोल्हापूर अन् नागपूरचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी निवड झालेले कोल्हापूर हे देशातील 13 वे केंद्र ठरले आहे.

    केंद्रातील औषध नियंत्रण विषयक वरिष्ठ संस्थेने कोरोनावरील कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. आयसीएमआरने लसीला मान्यता दिली आहे. हैदराबाद येथील भारत बायोमेक कंपनीने ही लस तयार केली आहे.

          या लसीसाठी आयुर्विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही) यांचे सहकार्य मिळत आहे. रक्त आणि कोव्हीडसह अन्य चाचण्या घेऊनही कोव्हॅक्सिनची निर्मिती झाली आहे. सुदृढ व्यक्तीवर या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी निवडलेल्या 13 केंद्रांमध्ये प्रत्येकी 100 जणांना ही लस दिली जाणार आहे.

               कोल्हापूर राज्यातील दुसरे लस चाचणी केंद्र
कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला या चाचणीसंदर्भात विचारणा झाली होती. महाविद्यालयाच्या नैतिक समितीने या लसीच्या मानवी चाचणीस परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात सोमवारपासून लस चाचणीसाठी 100 स्वयंसेवकांची नोंदणीला सुरूवात होणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणी घेणारे कोल्हापूर हे देशातील 13 वे केंद्र निश्चित झाले आहे. राज्यात कोव्हॅक्सिन चाचणीसाठी फक्त कोल्हापूर आणि नागपूरची निवड झाली आहे.


No comments:

Post a Comment