दाटे येथील तीनशे एकर जमीन पाण्याखाली, भातशेतीचे अपरीमित नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

दाटे येथील तीनशे एकर जमीन पाण्याखाली, भातशेतीचे अपरीमित नुकसान

दाटे (ता. चंदगड) येथे राज्यमार्गावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली भितशेती पाण्याखाली गेल्याने पिके कुजून लाखोंचे नुकसान झाले आहे. 
              चंदगड तालुका कोल्हापूर जिल्हयाचे शेवटचे टोक. हाकेच्या अंतरावर अत्याधुनिक सुविधा असणार बेळगाव शहर. पश्चिमेला असणार समृद्ध असं गोवा राज्य. अशा या सुखसमृध्दीच्या झुल्यात  झुलणारा चंदगड तालुका.डोंगराळ पण निसर्गाचे वरदान लाभलेला. पण एखादया वरदानाबरोबर उशाप असतो तसाच उशाप पुराच्या रूपाने चंदगड तालुक्याला मिळालेला आहे. बारा महिने पाण्याची उपलब्धता , बेळगावसारखी मोठी बाजारपेठ यामुळे विशेषत: इथला शेतकरी चार पैसे मिळवायचा. *पण पुराच्या पाण्यामुळे  चंदगड तालुक्याची अवस्था कोंडवाडयासारखी होऊन जाते.तालुक्यातून बेळगाव वेगूर्ला हा रस्ता जातो. खरं तर हा रस्ता म्हणजे तालुक्याची ह्रदयवाहिनी म्हटले तर वावगे ठरू नये.याच रस्त्यावरून शेतीमाल, वैदयकिय सुविधा पुरविल्या जातात. पण दरवर्षी जुलै -ऑगस्ट च्या दरम्यान तालुक्यातील दाटे या मध्यवर्ती ठिकाणी जवळ जवळ एक किलोमीटरचा  बेळगाव वेंगुर्ला रस्ता पाण्याखाली जातो. व बेळगावला जाण्यासाठी तालुक्याचा पश्चिम भाग मुकतो.तिकडे गडहिंग्लज कोल्हापूरला जाण्याचा मार्ग भडगाव येथेच बंद होतो. आणि संपूर्ण तालुक्याचा श्वास गुदमरतो. चंदगड तालुक्याची आवस्था पोरक्या मुलासारखी होते.
     दाटे येथील पंचक्रोशीतील शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली जाते. दोन ते तीन वेळा पुर आल्यामुळे भात रोप लागण अक्षरशः कुजून जाते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वस्तीला तात्पुरते दुसऱ्यांच्या घरी किंवा शाळेत स्थलांतरीत केले जाते. पुराच्या कालावधीत वैद्यकिय सेवा न मिळाल्यामुळे शेकडो रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. दरवर्षी दाटे येथे रस्त्यावर पाणी आले की दाटे येथील काही धाडशी तरुण जीवाची पर्वा न करता बैलगाडीतून प्रवाशांची ने आण करत. पण यावेळी कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे.या वर्षी दाटे येथील रस्त्यावर दुसऱ्यांदा पाणी आल्यामुळे चर्चेत आला आहे. दरवर्षीच्या या संकटातून सुटण्यासाठी दाटे येथील रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी दाटे ग्रामस्थाकडून होत आहे . या प्रश्नांकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावाकरून रस्त्याची उंची व नदीकाठच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.
                                             बातमी सौजन्य - संजय साबळे, दाटे

No comments:

Post a Comment