तालुक्यात पावसाचा जोर कायम, चंदगड-बेळगाव, गडडिंग्लज मार्ग बंद, पडझडीमुळे सव्वातीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

तालुक्यात पावसाचा जोर कायम, चंदगड-बेळगाव, गडडिंग्लज मार्ग बंद, पडझडीमुळे सव्वातीन लाखांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पाटणे (ता. चंदगड) येथील विलास शंकर तुपारे यांची भिंत पडून नुकसान झाले आहे. 
चंदगड / प्रतिनिधी
       गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पाऊस आज तिसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने पुरस्थिती आणखी बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे घटप्रभा नदीवरील तारेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील माणगाव, पिळणी,  भोगोली हे बंधारे पाण्याखालीच आहेत. बेळगाव-वेगुर्ला मार्गावर दाटे येथे रस्त्यावर पाणी आल्याने सकाळपासून या मार्गावरील वाहतुक बंद आहे. 
       अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होवून सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 130.83 मिलीमीटर तर आतापर्यंत 1866.175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटणे येथे विलास शंकर तुपारे यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले आहे. पंधरा दिवसापूर्वी श्री. तुपारे हे दुध काढण्यासाठी जनावारांच्या गोठ्यात गेले असताना भिंत जनावारांच्या व श्री. तुपारे यांच्यावर पडल्याने तुपारे यांच्यासह जनावरेही जखमी झाली होती. याबाबत शासकीय यंत्रणेने   पंचनामा करुन त्वरीत नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. 
                       अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान
१) मौजे मुरुकुटेवाडी येथील पार्वती केदारी जाधव घराची भिंत पडून 15000 नुकसान 2) मौजे कालकुंद्री येथील मीराबाई नारायण सुतार घराची भिंत पडून 100000 नुकसान 3) मौजे लाकूरवाडी येथील भीमराव यल्लाप्पा राजगोळकर यांच्या घराची भिंत पडून 20000 नुकसान 4) मौजे लाकूरवाडी येथील मारुती रानबा राजगोळकर यांचे घराची भिंत  पडून 25000 नुकसान. 5) मौजे कामेवाडी  येथील मारुती बसाप्पा नाईक  घराचे भिंत पडून  80000 नुकसान. 6) मौजे लैकिकट्टे येथील लक्ष्मी मारुती धुमाळे घराची भिंत पडून 40000 नुकसान. 7) मौजे तेउरवाडी येथील अशोक बसाप्पा मांग घराची भिंत पडून 35000 नुकसान असे एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  
                             पावसाची आकडेवारी
रविवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड  १४७ (२२५९), नागणवाडी १३८ (१९०८),  माणगाव ९८ (८९४), कोवाड ८२ (९१४),  तुर्केवाडी १४२ (१९३८), हेरे १७८ (३२८४). No comments:

Post a Comment