शेतकऱ्यांच्या सहनशीलतेमूळेच हेरे सरंजामधील जमिनीचे उतारे दुरूस्तीचे काम पूर्णत्वास -जिल्हाधिकारी दौलत देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2020

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेमूळेच हेरे सरंजामधील जमिनीचे उतारे दुरूस्तीचे काम पूर्णत्वास -जिल्हाधिकारी दौलत देसाई

हेरे सरंजामधील उता-यांचे जिल्हाधिकारी,खासदार,आमदारच्या उपस्थितीत वाटप
हेरे (ता. चंदगड) येथील शेतकर्याना दुरूस्ती केलेले उतारे वाटप करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई,बाजूला खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील प्रांताधिकारी पांगारकर,तहसिलदार रणवरे आदी

चंदगड / प्रतिनिधी 
           पिढ्यानपिढ्या जमिन कसत असूनही ती स्वतःच्या मालकीची नसल्याने अनेक प्रश्न हेरे सरंजाम वतनाबाबात निर्माण झाले होते. अखेर यावर्षी सुटका झाली असून या जमिनी खऱ्या अर्थाने शेतक-याच्या हक्काच्या झाल्याचे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. या भागातील अर्धी चड्डी घालणारे लोक खरं तर खूप प्रामाणिक आणि सहनशील असल्यानेच 1954 पासून हा अन्याय सहन करत राहिले, खरं पाहता आतापर्यंत आंदोलन करायला हवं होतं. मात्र, आता हा प्रश्न सोडवला जात असल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.
            स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हेरे व  मौजे मोटणवाडी या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, दिनेश पारगे,उपस्थित होते.
                 यावेळी हेरे सरंजाम वतनांचा भुधारणा वर्ग २ कमी करून भुधारणा वर्ग १ करण्यात आले आहे. त्या ७/12 चे वाटप जिल्हाधिकारी दौलत देसाई, खा. मंडलिक व आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
जिल्हाधिकारी देसाई पूढे म्हणाले की, हेरे सरंजाम वतनांचे एकरक्कमी शेतसारा भरून घेत शेतकऱ्यांना त्रास न देता त्यांच्यापर्यंत प्रशासनाने जात हा प्रश्न मार्गी लावला आहे. यामध्ये स्थानिक पातळीवरून अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यात एकरक्कमी काम होऊ नये, काम कसं अवघड आहे, होणारच नाही यासाठी मध्यस्त लोकांचे प्रयत्न होत होते. हे सर्व पाहता प्रशासनच शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कमी कालावधित हे काम पूर्ण केल्याचे सांगून  जिल्हाधिकारी देसाई यांनी 
हेरे सरंजामचा प्रश्न एकदा मार्गी लागल्यावर या उपविभागातील आणखी एक देवस्थानचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. तोही मार्गी लावण्याच प्रयत्न करणार आहे. देवस्थानच्या हजारो एकर जमिनी अजूनही नावावर नाहीत. तसेच काही ठिकाणी 88ब चे प्रश्न प्रलंबित आहेत. वाहिवाटिला नावे लागलेली नाहीत. त्याही हजारो एकर जमीन कुळांच्या नावावर करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी सांगितले 
        यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या की, जनतेसाठी आणि जनतेत जाऊन काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना होत्या. त्यानुसार जनतेला कमीतकमी नव्हे तर अजिबात त्रास न देता हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम वतनाची जमिन असणारी एकूण ५६ गावे आहेत. सदर गावांमध्ये वहिवाटदारांना जमिनीचे वाटप झालेले आहे. त्यावेळी सदर जमिनीचा भूधारणा प्रकार वर्ग १ झालेले नसल्याने सोसायटी, बॅंक यांच्याकडून कर्ज घेणेस अडचणी येत होत्या. त्या लक्षात घेवून 8 उपजिल्हाधिकारी, 8 तहसीलदार यांच्या पथकाच्या माध्यमातून अशा 128 कर्मचाऱ्यांनी काम पूर्ण केले आहे. याच माध्यमातून एकाच दिवशी पावणे चार हजार लोकांना दाखले दिले जाणार आहेत. गेल्या जवळपास सात महिन्यापासून हे काम सुरु असून अजून इतकाच काम शिल्लक आहे. तेही येत्या काहींच दिवसात तेही पूर्ण झालेलं असेल असे प्रांताधिकारी यांनी नमुद केले.
        खासदार मंडलिक यांनी हेरे सरंजाम वतनातील शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने महसुली स्वातंत्र्य मिळाले आहे. शेतकऱ्यांना आज त्यांचा हक्क प्राप्त झाल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले  चंदगड तालुक्यात अनेक महसुलचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकल्पांच्या दाखल्यांचे प्रश्न आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये जमिनी, घरे मिळालेली असूनही ते नावावर नाहीत. त्याही प्रश्नांमध्ये लक्ष घालून त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग काढावा असे आवाहन पाटील यांनी केले. तसेच दौलत साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दौलटचे दोन आरआरसी झालेले आहेत. तरी अजून त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ते आपण लक्ष घालावे अशी विनंती आमदार पाटील यांनी केली. लाभार्थी गुरुप्रसाद गावडे, महादेव प्रसादे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      कार्यक्रमात लक्ष्मण बाबू वंजारे, उमाजी तानाजी नाईक, सुनीता लक्ष्मण पवार, श्रीपाद कृष्णाजी तेलंग, ईश्वर कृष्णा गावडे, साताप्पा शिवलिंग प्रसादे, गुरुप्रसाद पांडुरंग गावडे या शेतकऱ्यांना हेरे सरंजाम जमीन वर्ग 2 चे वर्ग 1 केले बाबतचे 7/12 उतारे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मंडलाधिकारी प्रविण खरात,अशोक कोळी,तलाठी व शेतकरी वर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment