वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १५ (बिनविषारी साप) डुरक्या घोणस - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १५ (बिनविषारी साप) डुरक्या घोणस

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : १५ (बिनविषारी साप) डुरक्या घोणस
डुरक्या घोणस (Russell's Earth boa /Common Sand Boa / gonglyophis conicus)

डुरक्या घोणस हा बिनविषारी साप असून त्याला कांडर असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून अजगराचा नातेवाईक आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स प्रजातीच्या एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात.

 डुरक्या घोणस भारतात सगळीकडे आढळतो. रेताड मातीत राहणे पसंत करतो. जमिनीत विशेष खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा वाळवंटात राहणारा साप समजला जातो. पण मैदानी प्रदेशासह जास्त पाऊस, दाट जंगले आणि डोंगराळ अशा सह्याद्री पश्चिम घाटातही तो आढळतो.

 याची लांबी ४० ते ९० सेंमी. असून शरीर जाड असते. शेपूट अतिशय आखूड, निमुळती आणि कमी  लांबची असते. त्याला टोक असते. पाठीचा रंग करडा असतो किंवा त्यात गुलाबी छटा दिसते. पाठीवर पिवळसर तपकिरी किंवा गडद तपकिरी-चॉकलेटी रंगाचे मोठे ठिपके असतात. काहींचा रंग काळसर असून पाठीवर करडया रंगाचे विषम आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. मुस्कट पुढे आलेले असून जमिनीत बिळे करण्यासाठी ही त्याचा उपयोग होतो. डोळे फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुडया चिरेसारख्या असतात.
 डुरक्या घोणस विद्रूप आणि अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळया हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक वगैरे खाऊन तो आपली उपजीविका करतो. भक्ष्याला शरीराच्या विळख्यात  आवळून ठार मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.  याची मादी उन्हाळयात अंडी घालते,  काही ठिकाणी  मादी थेट पिल्लांना जन्म देते, असेही आढळले आहे.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  


सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

*शब्दांकन/संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment