आयुष्मान आरोग्य मंदिर नागनवाडी येथे पाचवी नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीपणे केल्यानंतर बाळाला घेतलेल्या डॉ. ऋतुजा पवार सोबत आरोग्य कर्मचारी व नातेवाईक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
सध्याच्या काळात गरोदर महिलांचे नॉर्मल बाळंतपण (डिलिव्हरी) होणे दुरापास्त झाले आहे. डिलिव्हरी साठी ॲडमिट झालेल्या महिलांची नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी अशा खाजगी रुग्णालयातून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. सिझेरियन ऑपरेशन करण्याचीच घाई सुरू असते. यात गोरगरिबांचे हजारो रुपये वैद्यकीय उपचारासाठी खर्च होत आहेत. या प्रकाराला फाटा देत महाराष्ट्र शासनाच्या नागनवाडी ता. चंदगड येथील उपकेंद्र तथा समुदाय आरोग्य केंद्राने बाळंतपणासाठी आलेल्या महिलांचे नॉर्मल बाळंतपण करून इतर दवाखान्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
रविवारी दि. २४ रोजी दाखल झालेल्या गरोदर महिलेची सोमवारी नॉर्मल डिलिव्हरी केली. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारचे हे पाचवे पाचवे बाळंतपण झाले आहे. नागनवाडी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सौ ऋतुजा योगेश पोवार यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सलग पाचवे नॉर्मल बाळंतपण केले. या कामी त्यांना परिचारिका उषा गावडे, आरोग्य सेवक प्रतीक टोपले, आशा स्वयंसेविका वर्षा धनुक्षे व इतर स्टाफ चे सहकार्य लाभले. डिलिव्हरीनंतर बाळाची माता व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
सध्या शासकीय रुग्णालये आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या कामकाजाबाबत समाजात चांगले उद्गार निघताना दिसत नाहीत. तथापि नागनवाडी सारखी उपकेंद्रे गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण ठरत आहेत. इतर शासकीय व खाजगी दवाखाने अशा केंद्रांचा आदर्श घेतील का? असा प्रश्न रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना पडला आहे. दरम्यान उप केंद्रातील डॉक्टर व स्टाफ ने केलेल्या नॉर्मल व पूर्णपणे मोफत डिलिव्हरी तसेच नेहमीचे रुग्णाभिमुख आदर्श कार्य यांची दखल घेऊन नागनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी डॉक्टर व सर्व स्टाफचा जाहीर सत्कार करून त्यांच्या कामाची पोच पावती दिली होती.
No comments:
Post a Comment