![]() |
कालकुंद्री येथील काशिर्लिंग दूध संस्था वार्षिक सभेवेळी सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या सभासदांना बक्षिसे देण्यात आली. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री येथील चंदगड तालुक्यातील सर्वात जुनी व अग्रगण्य दूध संस्था म्हणून परिचित असलेल्या श्री काशिलिंग सहकारी दूध संस्थेची ४६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. संस्थेच्या स्व मालकिच्या इमारतीतील सभागृहात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी व्हा. चेअरमन शिवाजी जाधव होते. प्रास्ताविक संचालक पी. वाय. पाटील यांनी केले. सचिव तानाजी गोपाळ पाटील यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी बोलताना संस्थापक एम. जे. पाटील यांनी सन २०२४-२५ मध्ये दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादक सभासदांना म्हैस दुधासाठी २१ टक्के तर गाय दुधाला १८.५ टक्के लाभांश जाहीर केला. हा लाभांश संस्थेचा आत्तापर्यंतचा विक्रमी डिव्हिडंड असल्याचे सांगितले. उत्पादकांनी गाय तसेच म्हैस दूधाचा जास्तीत जास्त पुरवठा करून गोकुळ दूध संघात काशिर्लिंग दूध संस्थेला पुन्हा प्रथम क्रमांक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन केले. दुधाचे प्रमाण अजून वाढल्यास यावर्षी पेक्षा पुढील वर्षी आणखी लाभांश देणे शक्य होईल. असे त्यांनी सांगितले. जाहीर केलेला डिव्हिडंड हा दूध उत्पादकांनी वर्षभरात जितक्या रुपयांचे दूध संस्थेस पुरवठा केले आहे त्या रकमेच्या प्रती शेकडा २१ व १८ टक्के मिळेल. असे सचिव तानाजी पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेला अहवाल वर्षात सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या प्रथम तीन विजेत्यांना बक्षीस स्वरूपात भांडी देण्यात आली. यातील गाय दुध पुरवठा करणारे विजेते प्रथम क्रमांक- रामलिंग शिवाप्पा पुजारी (१७६९७ लिटर), द्वितीय क्रमांक- शंकर लक्ष्मण जाधव (११८५८ लिटर), तृतीय क्रमांक- ज्ञानदेव भरमू पाटील (७३४७ लिटर). म्हैस दूध पुरवठा करणारे विजेते प्रथम क्रमांक- संजय बसाप्पा पुजारी, कागणी (५९०५ लिटर), द्वितीय क्रमांक- सुबराव दत्तू ओवळकर, कुदनूर (४२०२ लिटर), तृतीय क्रमांक- जयराम बाळू बोंद्रे, कागणी (३४१५ लिटर) यांचा समावेश आहे. यावेळी संस्थेच्या वतीने चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील कालकुंद्री यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक कृष्णा हनुमंत पाटील, नारायण बाबू पाटील, सुजाता मारुती पाटील, मनीषा सुरेश जाधव आदी संचालक, रामू पाटील, सद्रोद्दिन मोमीन, कल्लाप्पा पाटील, सदु परीट, विष्णू पाटील आदी दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयवंत जोतिबा पाटील व पुंडलिक निंगाप्पा नाईक यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment