पत्रकारांना माहिती देताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे. शेजारी अन्य अधिकारी व कर्मचारी.
बेळगाव : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव - वेंगुर्ला मार्गावरील सुळगा (हिं.) गावात हॉटेल जवळ 50 किलो गांजा सह तीन कार जप्त करून बेळगाव पोलिसांनी सहा तरुणांना ताब्यात घेतले आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने बेळगावसह चंदगड तालुक्यातही खळबळ उडाली आहे. या गांजा प्रकरणाशी चंदगड मधील तरुणांचे धागेदोरे आहेत का, याचाही तपास गतीने सुरू आहे.
याबाबत बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातून दोन कारमधून बेळगावला येत असलेल्या गांजा रॅकेटमधील इस्माईल आणि ताजीर या दोन आरोपींना थांबवून तपासणी करण्यात आली असता हे रॅकेट उघडकीस आले. इस्माईल उर्फ सद्दाम बाबू सय्यद (वय ३५, कणगला येथील करजगा रोड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), ताजीर गुडूसाब बस्तवाडे (वय २९, रा. जयंतीनगर, कणगला) प्रथमेश दिलीप लाड (वय २९, महागाव, गडहिंग्लज जि. कोल्हापूर, महाराष्ट्र), तेजस भीमराव वाजरे (वय २१, रा. जयंतीनगर, कणगला), शिवकुमार बाळकृष्ण असबे (वय २९, महागाव), रमजान दस्तगीर जमादार (वय ३४, लक्ष्मी गल्ली कणगला, सध्या कोरेगाव, सातारा, महाराष्ट्र) हे सहाजण ४५ किलो गांजा बाळगताना पकडले गेले. त्यांच्याकडून पोलिसांनी १० मोबाईल फोन, एक चाकू, एक वजन यंत्र, ४ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन कार आणि ५० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
प्रथमच पोलिसांनी गांजा विक्री नेटवर्कचा मुख्य आरोपी आणि दलाल इस्माईल उर्फ सद्दाम याला अटक केली आहे. तो मध्य प्रदेश आणि ओडिशामधून गांजा आणून विकत होता आणि पुणे आणि मुंबईमधून हेरॉईन पुरवत होता अशी माहिती आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकरणांपैकीहे एक प्रकरण आहे.
सीईएन निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. त्यांनी सांगितले की, पीआय गड्डेकर यांनी प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी मुंबई आणि इतर शहरांचा दौरा केला, विश्वसनीय माहिती गोळा केली, हल्ल्याची योजना आखली आणि अखेर एक मोठा समाजविरोधी कृत्य उधळण्यात यश आले.
No comments:
Post a Comment