नुकसान झालेल्या ऊस व केळी पिकाचा तात्काळ पंचनांमा करावा- माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2020

नुकसान झालेल्या ऊस व केळी पिकाचा तात्काळ पंचनांमा करावा- माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची मागणी

भरमुआण्णा पाटील
मजरे कार्वे /प्रतिनिधी (सी एल न्यूज):--
       चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचे व केळीचे पाऊस व वादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे महसूल विभागामार्फत तात्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी माजी रोहयो राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिक.
      प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते म्हणतात,कोरोना मुळे उदभवलेल्या परिस्थिती मुळे व लहरी निसर्गामुळे मुळातच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे व कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांनी शेतातील पिके जीवापाड जपली होती. याचमुळे या विभागातील शिवार हिरवागार झाला होता. पिकांची वाढ सुद्धा दरवर्षी पेक्षा जास्त होती. मात्र शेतकऱ्यांच्या पाठीमागील शुक्लकाष्ठ काही केल्या सुटत नाही.जून व जुलै महिन्यात माफक पाऊस पडला. म्हणावे तसे वादळही नव्हते. त्यामुळे ऊस, केळी व इतर पावसाळी पिके शिवारात बहरलेली दिसत होती. ऑगष्ठ महिन्यात पावसाने जोर केला आणि होत्याचे नव्हते झाले.प्रचंड पाऊस व वादळी वाऱ्याने ऊस पिकासह केळी व इतर पिके जमीनदोस्त झाली.शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले. हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाला. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने ठामपणे उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment