कार्वेतील बी एस एन एल चा मनोरा असून अडचण, ग्राहकांतून नाराजी - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2020

कार्वेतील बी एस एन एल चा मनोरा असून अडचण, ग्राहकांतून नाराजी

मोबाईल मनोऱ्याचे संग्रहित छायाचित्र
निवृत्ती हारकारे / मजरे कार्वे सी एल न्यूज, प्रतिनिधी
            मजरे कार्वे येथे कार्यान्वित असलेला बी एस एन एल चा मनोरा असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.गेल्या महिनाभरापासून या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला की हा मनोरा बंद पडत आहे.त्यामुळे येथील ग्राहक हवालदिल झाले आहेत.
           अनेक वर्षांच्या मागणीनंतर व पाठपुराव्याने येथे बीएसएनएल चा हा मनोरा उभारण्यात आला आहे. कार्वे परिसरात दुसऱ्या कुठल्याही कंपनीची मोबाईल सेवा नाही. त्यामुळे बीएसएनएल कडे ग्राहक मोठ्या संख्येने आकर्षित झाले आहेत. इतर कंपनीच्या सेवेपेक्षा वाजवी दरात बीएसएनएल ची सेवा मिळत असते. त्याचा फायदा येथील ग्राहकांना झाला आहे. कित्येक वेळा हा मनोरा बंद पडतो दोन तीन दिवस बंद अवस्थेतच असतो. तरीही येथील ग्राहक बुक्क्याचा मार सहन करीत आहेत. गेल्या महिनाभरापासून तर ही सेवा कूच कामी ठरली आहे. येथे मनोऱ्याच्या बॅकअप साठी असलेल्या बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर लगेच हा मनोरा बंद पडतो. पुन्हा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर एक तासाने मनोरा सुरू होतो. दिवसातून किमान सहा ते सात वेळा वीजपुरवठा खंडित झाला की किमान सात ते आठ तास हा मनोरा बंद अवस्थेत असतो. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे महावितरण कंपनी कडून वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खूपच कमी आहे.झाडांच्या फांद्या मोडून तारेवर पडण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. त्यामुळे एकदा वीजपुरवठा खंडित झाला की सुरळीत होण्यासाठी कित्येक तास प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा थेट परिणाम या बीएसएनएल च्या मनोऱ्यावर होत आहे. त्यामुळे हा मनोरा असून अडचण व नसून खोळंबा अशी झाली आहे.
           कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे येथील शाळा व महाविद्यालये सध्या बंद अवस्थेत आहेत. कित्येक शाळांचा अभ्यासक्रम सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.त्यामुळे या ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यातही या मनोऱ्यामुळे अडचणी येत आहेत. दुसऱ्या कुठल्याही कंपनीची सेवा नाही. व असलेली सेवा सुरळीत नाही अशा अवस्थेत येथील शिक्षक, विध्यार्थी व पालक अडकले आहेत. या मनोऱ्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली तर कुणीही दादा घेत नाहीत. लॉकडाऊन मुळे साहित्य मिळत नाही त्यामुळे ही सेवा सध्यातरी अशीच सूरु राहणार अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या मनोऱ्या ची सेवा पूर्ववत व अखंडीत पणे सुरू करावी अन्यथा बीएसएनएल विरोधात आंदोलन करण्याचा इशारा मजरे कार्वे ग्रामस्थांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment