चंदगडला काहीशी उसंत, आजपर्यंत १९१२ मिमी पाऊस, नेसरी-बेळगाव मार्ग पाण्याखालीच - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2020

चंदगडला काहीशी उसंत, आजपर्यंत १९१२ मिमी पाऊस, नेसरी-बेळगाव मार्ग पाण्याखालीच

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
       चंदगड तालुक्यात सोमवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात यंदाचा विक्रमी एका दिवसातील सरासरी १३१ मिमी तर हेरे येथे १७८ मिलिमीटर पाऊस पडला होता. आज पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसेथे आहे. ताम्रपर्णी नदीच्या पुरामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर जनजीवन विस्कळित झाले आहे. कोवाड येथे रस्त्यावर पाणी असल्यामुळे नेसरी ते बेळगाव मार्गावरील वाहतूक तिसऱ्या दिवशी ही ठप्प  आहे.
     निरंतर पडणाऱ्या पावसामुळे  तालुक्यातील २३ पैकी २० धरणे ओहरफ्लो झाली आहेत. तालुक्यातील घटप्रभा-फाटकवाडी, झांबरे-उमगाव व जंगमहट्टी हे तिन्ही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. लघुपाटबंधारे पैकी जेलुगडे, कळसगादे, सुंडी, किटवाड नं १, किटवाड नं २, पाटणे, आंबेवाडी, दिंडलकोप, हेरे, कुमरी, लकिकट्टे, काजिर्णे प्रकल्प  शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्पापैकी आज अखेर करंजगाव- ५१.१४, खडक ओहोळ- ६८.६१, निटुर नं.२- ७७.०७, टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय  जलसंधारण विभागाकडील निट्टूर नं १, मलतवाडी,  कुदनुर व हलकर्णी हे चारही तलाव १०० टक्के भरले आहेत.
      मंगळवार दि. १८ सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड  ५५(२३१४), नागणवाडी ४४ (१९५२),  माणगाव २६ (९२०), कोवाड २४ (९३८),  तुर्केवाडी ४२ (१९८०), हेरे ८७(३३७१), चोवीस तासातील एकूण पाऊस २७८ तर सरासरी पाऊस ४६ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस ११४७५ तर सरासरी पाऊस १९१२ मिलिमीटर इतका झाला आहे. तालुक्यात आज अखेर हेरे मंडलात सर्वाधिक सर्वाधिक पाऊस झाला आहे. सततच्या पुरामुळे बुडून  नदीकाठावरील भात पिके खराब झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसात महापूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे झाले आहे.


No comments:

Post a Comment