कार्वे येथे केंद्रमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची शैक्षणिक आढावा बैठक संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2020

कार्वे येथे केंद्रमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची शैक्षणिक आढावा बैठक संपन्न

कार्वे येथे केंद्र मुख्याध्यापक शैक्षणिक आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना विस्ताराधिकारी एम टी कांबळे, सोबत केंद्रप्रमुख व बीएआरसी विषय तज्ञ.
कारवे : सी एल वृत्तसेवा 
      शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगडच्या वतीने  गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले विद्यालय कार्वे येथे केंद्र मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी एम टी कांबळे हे होते. कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससह सर्व नियम पाळून बैठक संपन्न झाली. बी आर सी संगणक ऑपरेटर अमित चौगुले यांनी विद्यार्थी आधार अपडेशन व प्रपत्र ब संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. पाच वर्षांपेक्षा कमी वय असताना काढलेली आधार कार्ड विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर डोळे व बोटांच्या ठशांसह नव्याने अपडेट करणे गरजेचे आहे. विद्यार्थी पंधरा वर्षाचा झाल्यावर पुन्हा अपडेट करावे लागते. ही प्रक्रिया जिप. मार्फत शाळास्तरावर करण्यात येणार आहे.  जून २०२० ते एप्रिल २०२१ या सालासाठीची तालुक्याची माहिती ७१ टक्के पूर्ण असून उर्वरित काम २८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी बीआरसी विषय तज्ञ सुनील पाटील यांनी केंद्रस्तरीय ऑनलाइन शिक्षण परिषद बाबत मार्गदर्शन केले. एम टी कांबळे यांनी शालेय विद्यार्थी समूह अध्ययन-अध्यापन, तंबाखूमुक्त हायस्कूल शंभर टक्के करणे, तालुक्यातील रिक्त जागा, विज्ञान विषय पदवीधर शिक्षक आदींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख जी बी जगताप, एस के सावंत, डी आय पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्रप्रमुख एम. टी. कांबळे यांचा विस्ताराधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल केंद्र मुख्याध्यापकांच्या वतीने चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व १९ केंद्र मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक  प्रधान यांनी केले. आभार विनोद कोळी यांनी मानले.

No comments:

Post a Comment