चंदगड-कोदाळी रोडवरील वृक्षतोडीचा भाजप युवा मोर्चाकडून निषेध, बांधकाम विभागाचे अभियंता बुरुड यांचा रस्ता अडवून विचारला जाब - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2020

चंदगड-कोदाळी रोडवरील वृक्षतोडीचा भाजप युवा मोर्चाकडून निषेध, बांधकाम विभागाचे अभियंता बुरुड यांचा रस्ता अडवून विचारला जाब

योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होत नसल्याचा आक्षेप
चंदगड-कोदाळी रोडवरील वृक्षतोडीचा भाजप युवा मोर्चाकडून  बांधकाम विभागाचे अभियंता बुरुड यांचा रस्ता अडवून जाब विचारला.
चंदगड (प्रतिनिधी) : 
           चंदगड तालुका निसर्ग संपदेसाठी ओळखला जातो असे असतांना नेसरी ते कोदाळी रोडच्या कामामध्ये येथील वृक्ष संपदा मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहे. यामध्ये योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होत नसल्याचा आक्षेप घेत भारतीय जनता तालुका युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
        याबाबत बांधकाम विभाग कोल्हापूरचे अभियंता श्री. बुरुड यांचा रास्तारोको करत जाब विचारला. दरम्यान, धोकादायक व जीर्ण वृक्षांना प्राथमिकता देण्यात येत नसून वृक्षतोडीनंतर होणाऱ्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी होत आहे. याप्रश्नी भाजप तालुका युवा मोर्चाच्या वतीने बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्वरीत याप्रश्नी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे युवामोर्चा तालुका अध्यक्ष संदिप नांदगावकर यांनी केली.
        यावेळी भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष्य सचिन पिळणकर, तालुका अध्यक्ष संदीप नांदवडेकर, तालुका उपाध्यक्ष नितीन फाटक, जिल्हा सचिव चेतन बांदिवडेकर, विद्यार्थी संघटक कृष्णा कोलकार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
      बुधवारी नागणवाडी येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे अभियंता बुरुड यांची भेट घेत तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी तालुक्यात सुरु असलेल्या नेसरी ते कोदाळी या मार्गाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाकणात वृक्षतोड होत असून त्याबाबत योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होत नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप नांदवडेकर यांनी केली. तसेच चंदगड-शिरगाव रोडवरील वृक्षतोडीनंतर कचरा तसाच पडून गटारे चोकअप झाली आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबरच सांडपाणी वाहून जाण्यात अडथळा येत असून प्रचंढ दुर्गंधी होत असल्याचेही निदर्शनास आणून देत विचारणा करण्यात आली. दरम्यान, या प्रश्नाबाबत वारंवार सार्वजनीक बांधकाम विभाग चंदगड यांना कल्पना देऊनही बांधकाम विभागाकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत तालुक्यातील समस्यामध्ये लक्ष घालून सोडवण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर या सर्व प्रश्नांबाबात पाहणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन श्री. बुरुड यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment