|  | 
| जमीर मकानदार | 
तेऊरवाडी / संजय पाटील
         देव दगडात नसून माणसामध्ये आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय 'अर्थ सोपा आहे सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाश करण्यासाठी असणारे पोलिस. काही जणांमुळे  पोलीस खातं बदनाम जरी असलं तरी "सगळीच तशी नसत्यात" याच बाबतीत दिनांक 16 रोजी पाटणे फाटा चौकीतील पोलिस नाईक जमिर मकानदार यांच्या बाबतीत  दिसून आली . स्वतः उपाशी राहुन भूकेलेल्या अनोळखीची भूक भागवून आपल्या माणुसकीचे दर्शन घडवून दिले.
         पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे एक व्यक्ती काल भर पावसात दिवसभर रस्ता चुकल्यासारखे फिरत होती. संबंधित व्यक्तीचे राहणीमान पाहता ती व्यक्ती थोडी डोक्यांनी मंद असल्याचे जाणवले. ही गोष्ट पाटणे फाटा पोलीस चौकीचे इन्चार्ज जमीर मकानदार व डी एन पाटील यांना कळताच त्यांनी विचारणा केली. सदर व्यक्तीला मराठी येत नसल्याने ती कन्नड भाषेतून बोलत होती.त्याच्या बोलण्यात बेळगाव ला जायचं असल्याचे जाणवले.  त्याला सकाळचा नाश्ता देऊन काही वेळ थांबून घेतलं.   त्यानंतर स्वतः भाड्याने गाडी करत त्याला तो म्हणेल तिथं म्हणजेच  बेळगाव सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. या दरम्यान त्याच्या पोटाचा विचार करत स्वतःचा डबा त्याला खायला देऊन या दोन्ही पोलीसानी  माणुसकीचे दर्शन दिलं. 
         खरं तर कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करत असणाऱ्या घटना समोर येत असल्या तरी, दुसऱ्या बाजूला सगळेच पोलीस भ्रष्टाचारी आहेत, कायद्याचं उल्लंघन करतात असेही नाही. काही  काही वेळा पोलीस भ्रष्टाचारी असल्याचे चित्र रंगीत करून दाखवलं जातं पण त्याच वेळेला उन्हाची,  पावसाची, थंडीची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून 48 तास 72 तास तैनात असणाऱ्या पोलिसांच्या समस्या आम्हाला कधी कळणार?? 
           महाराष्ट्रातील काही पोलीस स्टेशन बघितली तर ती खुराडी बरी अशी अवस्था सद्यस्थितीला आहे.महिलांसाठी वेगळ्या कक्षाची वेगळ्या शौचालयाची व्यवस्था नाही. पोटच्या पोराला पोलिओ डोस पाजायला महिला पोलिसांना वेळ मिळत नाही. घरापासून लांब असणारे ठाणे, प्रवासात लागणारा वेळ व  ठाण्यात गेल्यानंतर वरिष्ठांकडून नव्हे तर सामान्य जनतेकडून सुद्धा मिळणारी वागणूक कधी थांबणार. या राज्यात 11 ते 5 काम करणाऱ्या सेवकांना संपावर जाता येतं पण 24- 24 तास ओन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांना मात्र कोणत्याही संपावर जाता येत नाही . "एक पोलिसवाला रस्ते मे खडा होता है,  इसलिए आप सारे चैन से सो  सकते है" हे अमिताभ बच्चनच्या  गाजलेल्या खाकी या चित्रपटातील डायलॉग असला तरी तो तुम्हा आम्हाला  नेहमीचं  आठवतं  असतो, पण त्या खाकी वर्दी घातलेल्या सर्व सामान्य माणसाचा आपण किती सन्मान करतो हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. अवघ्या मुल्काच्या  संरक्षणाची जबाबदारी असणारे पोलीस असतात त्यांच्या अंगावर जरी  खाकी वर्दी असली तरीसुद्धा त्या वर्दीच्या आतला माणूस हा सर्वसामान्यांसाठी माणूसच असतो. त्यालाही भावना असतात त्याला ही वेदना असतात त्या वेदना सुद्धा समजून घेणे सद्यस्थितीला गरजेचे आहे. कोरोनाच्या  महाभयंकर काळात जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या चंदगड सहित महाराष्ट्रातील पोलिसांना, तसेच स्वतःचा डबा खाऊ घेऊन माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या  या दोन पोलिसांच्या माणूसकीची चर्चा सर्वत्र होत आहे.
 

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment