अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ऊसपिक जमीनदोस्त, त्वरीत पंचनामे करुन मदत करण्याची बळीराजा संघटनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2020

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ऊसपिक जमीनदोस्त, त्वरीत पंचनामे करुन मदत करण्याची बळीराजा संघटनेची मागणी

पाऊस थांबण्याची वाट न पाहता कृषीविभागाने पंचनामे करावेत
अतिवृष्टी व वादळी पावसामुळे जमीनदोस्त झालेले ऊसाचे पिक.
चंदगड (प्रतिनिधी)
                 गेल्या चार दिवसापासून  सुरु असलेल्या वादळी पावसामुळे चंदगड तालुक्यातील उसाचे पिक जमिनदोस्त झाले आहे. नदिकाठाबरोबरच माळावरील जवळपास हजार एकर क्षेत्रातील उसाचे नुकसान झाले आहे. मागिल वर्षी आलेल्या महापूरानेही या नगदी पिकाचे प्रचंढ नुकसान केले होते. त्यातून सावरत यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने दहाएक हजार एकर उसाचे क्षेत्र पिकवले होते. त्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पाऊस थांबण्याची वाट न पाहता त्वरीत पंचनामे करुन मदत सुरु करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते श्री. नितिन पाटील यांनी केली आहे.
       नितीन पाटील म्हणाले की, गेल्या चार पाच दिवसापासून वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या मुसळधार पावासामुळे तालुक्यातील ऊस पिक जमिनदोस्त झालेलं आहे. नदिकाठचा ऊस तर झोपलेलाच आहे तर माळावरील उसाचेही नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी महापूरामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नदिच्या खोऱ्यातील भात पिक उद्वस्त झालं होते. तर उसपिकाचेही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालं होते. त्यातून शेतकऱ्यांनी पिककर्जाची पुर्नचना कशीबसी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा निसर्गाचा फटका बसला आहे. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास दहा ते बारा हजार हेक्टरवरील ऊस पिक चांगल्या पद्धतीने वाढवलं होते. पण या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हे पिकही हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. ऊसासारखे नगदी पीक जर वाया गेलं तर शेतकरी यातून सावरु शकणार नाही. त्यामुळे पाऊस थांबण्याची वाट न पाहता अशा या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याला शासनाने त्वरीत पंचनामे करुन मदत देण्यास सुरवात करावी.
          तसेच या वादळी पावसामुळे इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील दुसरे प्रमुख पिक असलेल्या काजूच्या झाडांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट आले आहे. तरी कृषिविभागाने त्वरीत मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे.

No comments:

Post a Comment