चंदगड तालुक्यात तिसऱ्यांदा पुरस्थिती, दहा बंधारे रात्रीपासून पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, पडझडीमुळे तीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2020

चंदगड तालुक्यात तिसऱ्यांदा पुरस्थिती, दहा बंधारे रात्रीपासून पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, पडझडीमुळे तीन लाखांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने गणुचीवाडी (ता. चंदगड) येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. 
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
      गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे रात्री तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासून अनेक मार्ग बंद आहेत. मान्सुन सुरु झाल्यापासून चंदगड तालुक्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुरस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवस दमदार पडलेल्या पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, कोवाड तर घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, हिंडगाव, कानडी, अडकूर या बंधाऱ्यासह गणुचीवाडी हा बंधाराही पाण्याखाली गेला आहे. 
    अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होवून सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 105 मिलीमीटर तर आतापर्यंत 1735.35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये चंदगड तालुक्यासह जिल्ह्यात महापुर आला होता. त्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. त्यातच यावर्षीही कोवाड बाजारपेठेमध्ये एकदा पाणी शिरल्याने त्या पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती असताना पाणी ओसरल्याने धोका टळला. दोन वेळा आलेल्या पुराने नदीकाठ भात, ऊस व अन्य पिके कूजून गेली आहेत. त्यातच आज तिसऱ्यांदा पुर आल्याने उरलीसुरली पिकेही कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेने याची दखल घेवून पुर ओसरल्यानंतर तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 
                             अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान
मौजे हेरे येथील सिंधू तानाजी नाईक घराची भिंत पडून 50000 नुकसान, मौजे जंगमहट्टी येथील संभाजी शंकर गावडे घराची भिंत पडून 80000 नुकसान, मौजे कलिवडे येथील पांडुरंग कदम यांच्या घराची भिंत पडून 50000 नुकसान, मौजे कलिवडे येथील तानबा कदम यांचे पत्राशेड पडून 50000 नुकसान , मौजे कलिवडे येथील रामा गणू कांबळे घराचे छप्पर उडून 50000 नुकसान  असे एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
                   दाटेतील शिवारातील पिकांची परिस्थिती
ताम्रपर्णी  नदीचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडल्याने दाटे परिसरामध्ये भात व ऊस शेती मध्ये पुन्हा पाणी आलयामुळे या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात महापुर आलेने पाच दिवस पिके पाण्यात होती. त्यामुळे बरीच पिके कुजली होती, या पावसामुळे शिल्लक राहीलेली पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
                                पावसाची आकडेवारी
रविवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड  १२९(२११२), नागणवाडी ११२ (१७७०),  माणगाव ८८ (७९६), कोवाड ५४ (८३२),  तुर्केवाडी ११६ (१७९६), हेरे १३१ (३१०६), चोवीस तासातील एकूण पाऊस ६३० तर सरासरी पाऊस १०५ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस १०४१२ तर सरासरी पाऊस १७३५ मिलिमीटर इतका झाला आहे.No comments:

Post a Comment