चंदगडात पावसाचा कहर, पुन्हा महापुराचा धोका, २३ पैकी १८ प्रकल्प ओव्हरफ्लो, हेरेत ३१०० मिमीचा टप्पा पार - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2020

चंदगडात पावसाचा कहर, पुन्हा महापुराचा धोका, २३ पैकी १८ प्रकल्प ओव्हरफ्लो, हेरेत ३१०० मिमीचा टप्पा पार

पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला कोवाड बंधारा.
विशाल पाटील / सी. एल. वृत्तसेवा, कालकुंद्री  
       चंदगड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काल शनिवारी रात्रीपासून पावसाचा कहर सुरू असून यामुळे ताम्रपर्णी नदीला दुसऱ्यांदा महापूर येण्याचा धोका बळावला आहे. मागील आठवड्यातील महापुरानंतर जनजीवन पूर्वपदावर येते न येते तोच पुन्हा ताम्रपर्णी नदी पात्राबाहेर पडल्यामुळे काठावरील नागरिकांची विशेष करून ऐन गणेश चतुर्थी हंगामात कोवाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची सुद्धा पळापळ सुरू झाली आहे.
         निरंतर पडणाऱ्या पावसामुळे चंदगड तालुक्यातील २३ पैकी १८ धरणे ओहरफ्लो झाली आहेत. आज रविवार सकाळी आठ वाजेपर्यंत च्या २४ तासात तालुक्‍यात सरासरी केवळ १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तीन मध्यम व २० लघुपाटबंधारे  प्रकल्पांत ९९.२५ टक्के साठा झाला असून पाणीपातळीत वेगाने वाढ सुरू आहे. यातील घटप्रभा- फाटकवाडी, झांबरे-उमगाव व जंगमहट्टी हे तिन्ही मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. लघुपाटबंधारे पैकी जेलुगडे, कळसगादे, सुंडी, किटवाड नं १, किटवाड नं २, पाटणे, आंबेवाडी, दिंडलकोप, हेरे, कुमरी प्रकल्प  शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी आज अखेर झालेला पाणीसाठा करंजगाव- ४०९, खडक ओहोळ- ६२.५०, लकीकट्टे- ९३.५८, निटुर नं.२- ७५.०६, टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. याशिवाय  जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अन्य चार लघु  तलावातील आजचा पाणीसाठा पुढील प्रमाणे; निट्टूर नं २ वगळता  मलतवाडी,  कुदनुर व हलकर्णी तीन तलाव १०० टक्के भरले आहेत.
 रविवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड  १२९(२११२), नागणवाडी ११२ (१७७०),  माणगाव ८८ (७९६), कोवाड ५४ (८३२),  तुर्केवाडी ११६ (१७९६), हेरे १३१ (३१०६), चोवीस तासातील एकूण पाऊस ६३० तर सरासरी पाऊस १०५ मिमी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस १०४१२ तर सरासरी पाऊस १७३५ मिलिमीटर इतका झाला आहे. तालुक्यात आज अखेर हेरे मंडलात सर्वाधिक ३१०६ तर माणगाव मध्ये सर्वात कमी ७९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस  भात पिकासाठी पोषक असला तरी मागील आठवड्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भुईसपाट झालेली ऊस पिके पुन्हा उभी करताना शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. तर नदीकाठावरील भात पिकेही पुराच्या पाण्यात बुडून खराब झाली आहेत यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
       कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता कहर आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर अतिवृष्टी आणि महापुराचा वाढता धोका यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी, व्यापारी यांच्या सह सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान शनिवारच्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे व पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.





No comments:

Post a Comment