आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2020

आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
      ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी-माजी सैनिकांनी देशासाठी प्राणांची बाजी लावून देश संरक्षणार्थ केलेली सेवा विचारात घेऊन त्यांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यामुळे सैनिकांना भावनिक दिलासा मिळून त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेश आणि नावाने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव ए. का. गागरे यांनी दि. १८.०८.२०२० काढला आहे. यामुळे आजी माजी सैनिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
      यापूर्वी संरक्षण दलातील शौर्य पदक किंवा सेवा पदक धारक व/ किंवा त्यांच्या विधवा पत्नी किंवा अवलंबितांच्या वापरात आणल्या जाणाऱ्या फक्त एका निवासी इमारतीस करातून सूट देण्यात येत होती. तथापि आजी-माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सवलत मिळावी अशी विनंती शासनाकडे पाच वर्षे प्रलंबित होती. त्याचा विचार करून शासनाच्या ग्रामविकास विभागाने वरील निर्णय घेतला आहे. अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत कडे सादर करणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment