वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २१ (बिनविषारी साप) मंडोळ / मांडूळ (John's Earth boa) - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2020

वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २१ (बिनविषारी साप) मंडोळ / मांडूळ (John's Earth boa)

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका  भाग : २१ (बिनविषारी साप) मंडोळ / मांडूळ
                        मंडोळ / मांडूळ (John's Earth boa)
      मंडोळ हा भारतात सर्वत्र पण कमी पावसाच्या किंबहुना वाळवंटी प्रदेशात अधिक प्रमाणात आढळणारा साप आहे. त्याची शेपटी व तोंड सारखेच दिसत असल्यामुळे या सापाला दुतोंड्या असे गैरसमजुतीने म्हटले जाते. याच्या शरीराची जाडी तोंडापासून शेपटीपर्यंत सारखीच दिसते. तो अंगाने जाड व पिळदार असतो. पूर्ण वाढ झालेल्या मंडोळ सापाची लांबी ६० ते ९० सेंटिमीटर असते. त्याचे डोळे आपल्याला सहज न दिसणारे अत्यंत बारीक असतात त्यामुळे तोंड व शेपटी चा भाग लगेच ओळखता येत नाही. त्यामुळे याला दुतोंडे म्हणण्यास आणखी वाव मिळतो. मंडोळ साप निशाचर असल्यामुळे भक्ष्याच्या शोधार्थ दिवसा बाहेर पडत नाही.  या सापाला घरात ठेवल्यास मोठा धनलाभ होतो; या अंधश्रद्धेपोटी याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री तथा तस्करी होते. यातूनच या सापाच्या मृत्यू व हत्त्येचे प्रमाणे अधिक आहे.
       पोटभरू गारुडी याची शेपटी कडील बाजूही दुसरे तोंडच आहे असे भासवण्यासाठी याचे आणखी हाल करतात. पुढे जाताना तोंडासमोर अडथळा निर्माण केल्यास हा शेपटीच्या दिशेने चालतो. त्यामुळे भोंदू गारूड्यांचे आणखीनच फावते. या सापांच्या शरीरात हाडे  नसतात. तो सहा महिने पुढील बाजूने तर सहा महिने मागील तोंडाच्या बाजूने चालतो. असे अनेक गैरसमज व अंधश्रद्धा या सापाच्या बाबतीत आहेत. हा साप अंडी घालतो; की घोणस प्रमाणे पिल्लांना जन्म देतो याबाबत सर्पतज्ञांत मतमतांतरे आहेत.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment